जेथे स्वाब तपासणी केली जाते तेथून अन्य ठिकाणी होणार
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात 45 वर्षावरील नागरिकांचे कोव्हिड 19 च्या प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. लसीकरण केंद्रांमध्ये होत असलेल्या गर्दीच्या अनुषंगाने ती गर्दी रोखण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकांना लस मिळण्यासाठी लसीकरण मोहिमेत सुसुत्रता आणण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विनय गौढा यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर लस किती उपलब्ध आहे त्याची माहिती दिली जाणार आहे. तसेच जेथे स्वाब घेतले जातात त्याच्यापासून अन्य ठिकाणी लसीकरण सुरु करावे, असेही त्या आदेशात म्हटले गेले आहे.
लसीकरण केंद्राबाहेर गर्दी जमत होती. त्यामुळे अनेकांना परत फिरावे लागत होते. लसीकरणामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नव्याने आदेश जारी केला आहे. त्यानुसार लस प्राप्त होताच सक्रीय कोव्हिड पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणारी लोकसंख्या या बाबींचा विचार करुन 50-50 टक्के या आधारावर सर्व केंद्रांना लस पुरवठा करण्यात यावा. या निकषामध्ये वेळोवेळी प्राप्त होणाऱया नवीन मार्गदर्शक सुचनानुसार बदल होईल. वेळोवेळी झालेले बदल जिल्हा व माता बाल संगोपन अधिकारी लस पुरवठय़ाबाबत तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना मेलद्वारे कळवतील. गटविकास अधिकारी ग्रामपंचायतींना कळवतील. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होणारी लस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी 50 टक्के लस वापरली जावी, व उर्वरित 50 टक्के लस ही त्या दिवशी ज्या उपकेंद्राच्या ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले आहे. त्या ठिकाणी दिली जावी, सर्व उपकेंद्रात सम प्रमाणात लसीकरणासाठी देण्यात येईल. उपकेंद्र स्तरावरील लसीकरण सत्रे उपलब्ध झाल्यानंतर चक्राकार पद्धतीने घेण्यात यावी जेणेकरुन कोणतेही उपकेंद्राच्या अंतर्गत नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेरील सुचना फलकावर त्या दिवशी वापरण्यात येणाऱया लसीचा साठा ठळकपणे दर्शविण्यात यावा, उपलब्ध लसीच्या संख्ये इतके टोकन काटेकोरपणे वाटप करण्यात यावेत. प्रतिक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना वेळावेळी प्रतीक्षा कालावधीची माहिती द्यावी. जेणेकरुन कोणताही लाभार्थी दिवसभर प्रतिक्षा करणार नाही. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार ज्या नागरिकांनी पूवी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी दि.15 पासून दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडय़ामध्ये देय आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील कोविड लसीकरणापुढील आदेश होईपर्यंत स्थगित रण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी आरटीपीसीआर व अँटीजेन टेस्ट केले जाते. त्यापासून अन्य ठिकाणी कोविड लसीकरण सत्रे पर्यायी जागेत घ्यावीत. लाभार्थ्यांसाठी मार्गदर्शक सुचना काटेकोरपणे पाळाव्यात. दुसरा डोस देय असणाऱयांना प्राधान्य द्यावे,. अशा सुचना दिल्या गेसल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण मोहिमेत सुसुत्रता येणार आहे.








