प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संपूर्ण जग हदरले आहे. या विषाणूचा नायनाट करण्यासाठी लस कधी तयार होणार? याची प्रतिक्षा संपूर्ण जगाला होती. अखेर लस तयार झाली असून कोरोनाकाळात सेवा बजावलेल्या वैद्यकीय कर्मचाऱयांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. तर दुसऱया टप्प्यात लस देण्यासाठी मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱयांची यादी तयार करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूमुळे देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आजारामुळे उपचार करण्यासाठी औषध नसल्याने लॉकडाऊनचा पर्याय शोधण्यात आला होता. तीन महिने लॉकडाऊन करून आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती. कोरोनावर औषध कधी तयार होणार? तसेच लस कधी उपलब्ध होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या विषाणूचा नायनाट करण्यासाठी विविध कंपन्यांनी लस तयार केली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेस प्रारंभ होणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रात काम केलेल्या कोरोना योद्धांना लस देण्यात येणार आहे.
कोरोना कालावधीत शहरातील स्वच्छतेचे काम आणि विविध उपाययोजना राबविण्यासाठी कार्य केलेल्या महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांना तसेच अन्य कर्मचाऱयांना लस देण्यात येणार आहे. अशाप्रकारची सेवा बजावलेल्या कर्मचाऱयांना दुसऱया टप्प्यात लस देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने महापालिकेला सूचना करून स्वच्छता कर्मचाऱयांची यादी देण्याची सूचना केली होती. तसेच अन्य कर्मचाऱयांची यादी देण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्या महापालिकेने दुसऱया टप्प्यातील लसीकरणासाठी महापालिकेच्या कायमस्वरुपी आणि कंत्राट पद्धतीने स्वच्छता काम करणाऱया तेराशेहून अधिक कामगारांची यादी महापालिका प्रशासनाने तयार केली आहे. सदर यादी महापालिकेने आरोग्य खात्याला सुपूर्द केली आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या सूचनेनंतर स्वच्छता सेवा बजावणाऱया कामगारांना दुसऱया टप्प्यात लस उपलब्ध होण्याची शक्मयता आहे.









