को-विन ऍप केवळ प्रशासकांसाठी- सरकारचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशव्यापी लसीकरणाच्या कार्यक्रमाने आता वेग घेतला असला तरी अद्याप लसीकरणासाठी नोंदणी कुठे करायची, यासंबंधी संभ्रम आहे. को-विन या ऍपवर ही नोंदणी करण्यासाठी अनेकांचा प्रयत्न आहे. पण त्यात अडचणी येत आहेत. तथापि, को-विन हे ऍप सर्वसामान्य नागरिकांसाठी नाही, हे महत्वाचे स्पष्टीकरण सरकारने सोमवारी केले. हे ऍप केवळ प्रशासकांसाठी, अर्थात, सरकारी कर्मचारी आणि आघाडीवरचे कोरोना योद्धे यांच्यासाठी आहे. सर्वसामान्यांनी को-विन या वेबसाईटवर जाऊन नोंदणीसंबंधी माहिती पहावी, असे स्पष्ट करण्यात आले.
को-विन पोर्टलच्या माध्यमातून वेबसाईटवर सर्वसामान्यांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी. नागरिक लसीकरणासाठी केव्हाही आणि कोठेही नोंदणी करून अपॉइंटमेंट घेऊ शकतात. यासाठी को-विन पोर्टल प्रमाणेच आरोग्य सेतू व इतर काही वेबसाईटस्वरही नोंदणी होऊ शकते.
प्रत्यक्ष नोंदणीचीही सोय
लस घेण्याची इच्छा असणारे नागरीक प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करू शकतात. कोणत्याही लसीकरण केंद्रावर ही नोंदणी केली जाऊ शकते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहितीही वेबसाईटवर देण्यात आली आहे. या बेबसाईटस्चा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
10 लाखांची नोंदणी
ज्येष्ठ नागरीक आणि व्याधीग्रस्त यांच्या लसीकरणाला 1 मार्च, अर्थात, सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. या उपक्रमाला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कारण, सोमवारी पहिल्या दिवशीच दुपारी 1 वाजेपर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी लसीसाठी नोंदणी को-विन या वेबसाईटवर केली आहे. लसींचा तुटवडा पडणार नाही, याची दक्षता सर्व केंद्रांवर घेतली जाणार आहे.
असे आहेत नियम...
कोणते नागरिक पात्र ?…
ड 60 वर्षांवरील किंवा 1 जानेवारी 2022 पर्यंत ज्यांना 60 वर्षे पूर्ण होत आहेत असे सर्व नागरीक नोंदणी करण्यासाठी पात्र
ड 45 वर्षांवरील किंवा ज्यांना 1 जानेवारी 2022 पर्यंत 45 वर्षे पूर्ण होत आहेत असे व्याधीग्रस्त नागरीकही नोंदणीसाठी योग्य.
नोंदणी कशी करावी ?
ड आपल्या मोबाईल क्रमांकावरून को-विन या पोर्टलवर नागरिक लसीकरणासाठी नोंदणी केव्हाही करू शकतील अशी सोय
ड मोबाईल क्रमांकाची वैधता पाहण्यासाठी वन टाईम पासवर्ड च्या माध्यमातून पडताळणी करण्याची सोय. हा पासवर्ड नोंदणीसाठी द्यावा
ड नोंदणी करताना ज्या मोबाईलचा उपयोग केला आहे, त्या मोबाईलच्या साहाय्याने तुम्ही को-विन पोर्टलला लॉगइन करू शकता
ड पोर्टलवर खाते उघडल्यानंतर लाभार्थींची संख्या वाढविणे, माहितीत बदल करणे, लसीसाठी अपॉइंटमेंट घेणे हे करता येणार आहे
ड ज्या नागरिकाने इतरांची नोंदणी केली असेल तोच त्यांची नावे काढून टाकू शकतो. ज्यांचे लसीकरण होईल त्यांची नावे वगळली जातील
ड नोंदणी केलेली व्यक्ती लसीकरण होईपर्यंत त्याने नोंद केलेल्या माहितीत आवश्यक तो बदल करू शकेल. अपॉईंटमेंटही बदलता येईल
ड नोंदणी केलेल्या व्यक्तीचे लसीकरण झाल्यानंतर मात्र, त्याच्या माहितीत किंवा कगदपत्रांमध्ये कोणताही बदल केला जाऊ शकणार नाही
ड नोंदणी केलेल्या व्यक्तीला त्याच्या ओळखपत्राचा प्रकार निवडण्याचा आधिकार आहे. लसीकरणाच्या वेळी या ओळखपत्राचा क्रमांक द्यावा
ड प्रत्येक नोंदणीकृत लाभार्थीच्या ओळखपत्राचा क्रमांक स्वतंत्र आणि वेगवेगळा असावयास हवा. गोंधळ टाळण्यासाठी हा नियम आहे
ड ऑनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड, निवडणूक ओळख पत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स आदी कागदपत्रे चालू शकतील
ड याशिवाय एनपीआर स्मार्ट कार्ड, एनपीआर कार्ड, छायाचित्रासहित असणारे कोणतेही निवृत्तीवेतन कागदपत्र नोंदणीकरणासाठी योग्य
ड ज्या व्यक्तींचे वय 45 ते 59 वर्षांपर्यंत आहे, त्यांना नोंदणी करताना त्यांना असणाऱया व्याधीही नोंद कराव्या लागणार आहेत
ड अशा 20 व्याधींची सूची सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यात मधुमेह, हृदयविकार इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे
ड अशा व्याधीग्रस्त नागरिकांनी लसीकरण करण्याच्या वेळी नोंदणीकृत डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यावसायिकाचे प्रमाणतत्र सादर करावे
ड वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नोंदणी पूर्ण होईल. लाभार्थींना तशी पावती त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे.









