प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव प्रत्येकासाठी धक्कादायक होता, पण आता कोरोनावर प्रतिबंधक लस आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱया लाटेला प्रतिबंध करणे शक्य झाले आहे. संसर्गाचा हायरिस्क फॅक्टर असलेल्या ज्येष्ठ, कोमॉर्बीड व्यक्तींने लस घेतल्यास त्यांना संसर्गाचा धोका बऱयाच प्रमाणात कमी होणार आहे, असे प्रतिपादन सीपीआर हॉस्पिटलमधील काडॅयॉलॉजिस्ट डॉ. अक्षय बाफना यांनी केले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या बागल चौक येथील संस्थेच्या हॉलमध्ये गुरूवारी कोरोना प्रतिबंधासाठी जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये डॉ. बाफना यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे होते.
डॉ. बाफना म्हणाले, देशात कोरोनावर कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. या लसीचे कोणतेही साईडइफेक्ट नाहीत. कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरीक, कोमॉर्बीड व्यक्तींना आहे. त्यामुळे प्राधान्याने त्यांना लस दिली जात आहे. ज्येष्ठ नागरीकांना कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही, पण कोमॉर्बीड व्यक्तीला डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रामुख्याने हृदय, किडनी, फुफ्फुस, लिव्हरशी निगडीत, रक्ताशी निगडीत विकार, रक्तदाब, मधुमेह रूग्णांनी ही लस घेतल्यास त्यांना संसर्गाचा धोका कमी होणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी लसीकरण बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
चहा व्यापारी असोसिएशनचे सचिव प्रमोद बुच्छा यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन प्रदीप व्हरांबळे यांनी केले. उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांनी आभार मानले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय पाटील, मानद सचिव वैभव सावर्डेकर, धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडीया, अजित कोठारी, प्रशांत शिंदे, संपत पाटील, अनील धडाम, संभाजी पोवार, राहुल नष्टे, अविनाश नासिपुडे, जयंत गोयानी, संलग्न संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्यानंतर कोल्हापुरात महिनाभराने पहिला रूग्ण
गतवर्षी कोरोनाची पहिली लाट आली, पुण्यात रूग्ण सापडल्यानंतर 20 ते 28 दिवसांनी कोल्हापुरात रूग्ण मिळाला अन् साथ सुरू झाली. आताही काल पुण्यात सुमारे 900 रूग्ण दिसून आले. कोल्हापुरात असे चित्र महिनाभराने दिसण्याची शक्यता आहे. पण तोपर्यत 100 टक्के लसीकरण झाल्यास कोल्हापूरला कोरोनाच्या दुसऱया लाटेचा धोका अत्यंत कमी राहणार आहे. अमेरिकेत कोरोनाच्या दुसऱया लाटेत सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठांचे झाले आहेत. त्यामुळे आपल्याकडे हे कोरोना हायरिस्क मृत्यू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. ज्येष्ठ नागरीक, कोमॉर्बीड रूग्णांनी लस घेतल्यास दुसऱया लाटेचा सर्वात कमी धोका कोल्हापूरला राहणार असल्याचे डॉ. बाफना यांनी स्पष्ट केले.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात नवे 28 रूग्ण, 14 कोरोनामुक्त
Next Article सांगली : मेंगाणवाडी, बलवडी परिसरात डोंगराला भीषण आग









