मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्र देशात कोरोना लसीकरणात आघाडीवर आहे. महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीचे आतापर्यंत ३ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. तीन कोटींपेक्षा जास्त डोस देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.
महाराष्ट्राने लसचे ३ कोटींपेक्षा जास्त डोस देण्याची कामगिरी आज (शुक्रवार २५ जून २०२१) दुपारी २ वाजता पूर्ण केली. ही माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी दिली. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसीचे ३ कोटी २७ हजार २१७ डोस देण्यात आले आहे.देशात महाराष्ट्र लसीकरणात आतापर्यंत अव्वल आहे. दरम्यान, लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास या संख्येत आणखी भर पडेल.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात ३० कोटी ६५ लाख ५७ हजार ६२८ कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस दिले आहेत. ही आकडेवारी आज (शुक्रवार २५ जून २०२१) सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.