आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांची माहिती : शनिवारी 3 लाख लसी उपलब्ध : आतापर्यंत 1.68 कोटी नागरिकांचे लसीकरण
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून कर्नाटक लसीकरणात देशात 6 व्या क्रमांकावर आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 68 लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. केंद्र सरकारने देशातील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार केंद्राकडूनच लसींचा पुरवठा करण्यात येत आहे. यानुसार शनिवारी राज्याला 3 लाख लसी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती मंत्री सुधाकर यांनी दिली.
राज्यात आजपासून अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार बेंगळुरातही याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे विविध जिल्हय़ांतून नागरिक बेंगळुरात परतत आहेत. यामुळे काहीअंशी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मात्र, नागरिकांनी भीती न बाळगता खबरदारी घ्यावी. कोरोना नियंत्रणासाठी मार्गसूचीचे पालन करून सहकार्य करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
राजीव गांधी आरोग्य विज्ञान विश्वविद्यालयाच्या हंगामी कुलगुरुपदी खासगी व्यक्तीच्या नेमणुकीबाबत राज्यपाल व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. मात्र, कुलगुरुपदासाठी असा व्यक्ती अद्याप आपल्या नजरेत आला नसून अजूनपर्यंत खासगी व्यक्तीची अशा मोठय़ा पदावर नेमणूक झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्य भाजपमधील असमाधानाची त्यांनी पती-पत्नीच्या भांडणाशी तुलना केली. जशी पती-पत्नीमध्ये भांडणे होतात, तशी मोठय़ा पक्षातही असमाधानाचे वारे वाहू लागते. राज्य भाजप प्रभारी अरुणसिंग कर्नाटक दौऱयावर येणार असून ते राज्यातील गोंधळ दूर करणार आहेत.
येडियुराप्पा हेच पुढील वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे अरुणसिंग व वरिष्ठांनी सांगितले आहे. त्यामुळे नेतृत्त्व बदलाची अनावश्यक चर्चा करण्यात येत आहे. आमदार अरविंद बेल्लद यांनी दिल्लीला जाऊन वरिष्ठांची भेट घेतली, यात काही विशेष नसून नेतृत्त्व बदलाचा प्रश्नच नसल्याचे डॉ. सुधाकर यांनी सांगितले.









