100 टक्के लसीकरण करणारे पहिले शहर
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाची राजधानी भुवनेश्वर हे 100 टक्के लसीकरण करणारे देशातील पहिले शहर ठरले आहे. म्हणजेच तेथील 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत. सातत्याने लसीकरण मोहीम राबविले गेले, 100 टक्के लसीकरणाचे लक्ष्य पूर्वीच निर्धारित करण्यात आले होते अशी माहिती दक्षिणपूर्व भुवनेश्वर महापालिकेचे उपायुक्त अंशुमान रथ यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.
भुवनेश्वरमध्ये 18 वर्षांपेक्षा अधिक वयाचे 9 लाख लोक आहेत. यात 31 हजार आरोग्य कर्मचारी, 33 हजार फ्रंटलाइन कर्मचारी आहेत. तर 5 लाख 17 हजार लोकांचे वय 18-44 वर्षांदरम्यान आहे. 3 लाख 25 हजार लोक 45 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. या सर्वांचे लसीकरण पार पडले आहे.
भुवनेश्वरमध्ये आतापर्यंत 18 लाख 16 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. एकही डोस न मिळालेल्या लोकांची संख्या खूपच कमी आहे. एकही डोस न घेण्यामागे लोकांची विविध कारणे असू शकतात. काही लोक नजीकच्या जिल्हय़ांमधून शहरात काम करण्यासाठी येत असतात. गरोदर महिलांना पहिला डोस देण्यात आल्याची माहिती रथ यांनी दिली आहे.
10 टक्के लोकांना संक्रमण

लसीकरण वाढूनही भुवनेश्वरमधील संक्रमणाला आळा बसल्याचे चित्र दिसून येत नाही. भुवनेश्वरमध्ये रविवारी 318 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात सक्रीय रुग्णांची संख्या 2.5 हजारांच्या नजीक आहे. शहरात आतापर्यंत 800 जणांचा मृत्यू ओढवला आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान शहरात 65 हजार रुग्ण सापडले आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार भुवनेश्वरची लोकसंख्या 8.37 लाख होती. अनुमानानुसार आता हा आकडा 10 लाखांच्या आसपास आहे. शहरातील 1 लाख लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
संक्रमणाचा दर
ओडिशात प्रतिदिन आढळणाऱया नव्या कोरोनाबाधितांची संख्या संसर्गमुक्त होणाऱयांपेक्षा अधिक आहे. ओडिशात रविवारी 74,735 कोरोना चाचण्या करण्यात आल्या, यातील 1,437 लोक संक्रमित आढळले. पुरी शहरात 146 रुग्ण दिवसभरात सापडले आहेत. भद्रक जिल्हय़ात 47 नवे बाधित आढळूनआले. राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 10 लाखांसमीप पोहोचला आह. राज्याचा टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट (टीपीआर) 1.92 टक्के इतका आहे. पुरी जिल्हय़ाचा टीपीआर 5 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. खबरदारीदाखल पुरीमध्ये विकेंड्सवेळी लॉकडाउन लागू करण्यात आले आहे.









