प्रतिनिधी /मडगाव
सत्य परिस्थिती वेगळी असताना, भाजप सरकारने नेहमीच खोटय़ा माहितीच्या आधारे जनतेसमोर आपली कामगिरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गोव्यात पात्र नागरिकांचे 100 टक्के कोविड लसीकरण झाल्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा हा भाजप सरकारच्या खोटारडेपणाचाच भाग असल्याची टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी घोषणा करण्यापुर्वी तथ्य व आकडेवारी तपासणे गरजेचे आहे. भाजपने अतीघाई करुन गोवा ‘ग्रीन झोन’ जाहीर केल्यानंतर गेल्यावषी गोव्यावर कोविडचे भयंकर संकट ओढवले होते याची आठवण दिगंबर कामत यांनी करुन दिली आहे.
बेजबाबदार भाजप सरकारने गोव्याला ‘हागणदारी’ मुक्त जाहीर केले. सरकार मात्र आजही नवीन शौचालये बांधत आहे व मोबाईल टॉयलेट्स ऑर्डर करीत आहे. लोक अजुनही गोव्यातील कित्येक भागात उघडय़ावर शौचास जात आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मतदारसंघात लोक अजुनही नळ जोडणी नसल्याने विहीर व नदीचे पाणी वापरत असताना, भाजप सरकारने गोव्यातील ग्रामीण भागात शंभर टक्के नळ जोडणी झाल्याचे जाहीर केले होते याची आठवण सुद्धा दिगंबर कामत यांनी करुन दिली आहे.









