अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 22 ऑक्टोबर, सकाळी 10.30
● महाविद्यालय आवारात विद्यार्थ्यांना मिळणार लस
● गुरुवारच्या अहवालात 51 बाधित
● 3996 जणांच्या चाचण्या
● 881 सक्रिय रूग्ण
सातारा / प्रतिनिधी :
संपूर्ण देशात गुरुवारी लसीकरणाने शंभर कोटीचा टप्पा ओलांडला असून, महाराष्ट्रात सुमारे साडे नऊ कोटीपर्यंत लसीकरण झाले आहे. आता अठरा वर्षांपुढील युवा वर्गाचे लसीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कंबर कसली असून 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान मिशन युवा स्वास्थ्य अभियान राबवले जाणार आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का आणखी वाढणार आहे. याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. दरम्यान गुरुवारी रात्री आलेल्या अहवालात 51 बाधित आले आहेत.निच्चांकी वाढीची नोंद कायम आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणार लस
राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. युवकांचे लसीकरण केले जावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात महाविद्यालय परिसरातच विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरण कक्ष, विश्रांती कक्ष आणि निरीक्षण कक्ष उभारण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविण्यात आली आहे.
राज्यात 40 लाखावर विद्यार्थी
राज्यात उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या सुमारे पाच हजार संस्था आहेत. त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी, खासगी विद्यापीठे अशा सर्व संस्थात मिळून सुमारे चाळीस लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना या अभियानाच्या कालावधीत लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. आरोग्य विभाग लसीकरणासाठी कर्मचारी देणार आहे.
सद्यस्थितीत महाविद्यालयात उपस्थिती कमी
सद्यस्थितीत महाविद्यालये सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांना दोन्ही लसीचे डोस बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अजूनही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. मिशन स्वास्थ्य अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे लसीकरण गतीने झाल्यास महाविद्यालयातील उपस्थितीही वाढणार आहे.
51 नवे रुग्ण
गुरुवारी रात्री आलेल्या अहवालातत 51 रुग्ण बाधित आले आहेत. बुधवारचा आकडा 50 पेक्षाही कमी होता. जिल्ह्यात सलग पंधरा दिवस शंभराच्या आत रुग्णांची नोंद होत असून हा रोजचा आकडा आता अतिशय कमी नोंदवला जात आहे. त्यामुळे अनेक तालुके कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत.
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 21,96,964
एकूण बाधित 2,50,782
कोरोनामुक्त 2,42,809
मृत्यू 6,401
उपचारार्थ रुग्ण 881
शुक्रवारी जिल्हय़ात
बाधित 51
कोरोनामुक्त 185
मृत्यू 00









