नवी दिल्ली / वृत्तसंस्था
16 जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू होणार आहे. परंतु याचदरम्यान लसीवर संशय व्यक्त करणाऱया काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. शशी थरूर, जयराम रमेश यासारख्या अनेक नेत्यांनी लसीबाबत संशय व्यक्त केला आहे. तर काँग्रेसशासित राज्य पंजाब, झारखंड अणि राजस्थानचे मंत्री लसीच्या समर्थनार्थ उभे ठाकले आहेत. लसीवर कुठल्याही प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नसल्याचे या राज्यांच्या मंत्र्यांनी म्हटले आहे. जनहिताप्रकरणी आपण केंद्र सरकारसोबत उभे आहोत असे झारखंडच्या मंत्र्याने काँग्रेसच्या नेत्यांना सुनावले आहे.
केंद्र सरकार आम्हाला लस उपलब्ध करत असताना विनाकारण प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत. लसीच्या चाचण्या झाल्या आहेत. पंतप्रधानांनी स्वतः सर्वांसोबत बैठका घेतल्या आहेत. लसीसंबंधी कुठल्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत असे उद्गार राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी काढले आहेत.
लसीमुळे सर्वांनाच लाभ
कोविड-19 लसीकरणाला वादात गोवण्याची गरज नाही. लसीकरण सर्वांच्या लाभासाठी आहे. भारत तसेच पूर्ण मानवतेसाठी ही मोठी कामगिरी आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांमध्ये रंगीत तालीम करविली आहे. लसीकरणात कुठलाही वाद निर्माण करणे टाळायला हवे. कोविड-19 लस तयार करणाऱया वैज्ञानिकांचे आभार मानतो असे पंजाबचे अन्न तसेच पुरवठामंत्री भारत भूषण यांनी म्हटले आहे.
जनहिताकरता केंद्रासोबत
सार्वजनिक कल्याण आणि राष्ट्रीय हिताच्या मुद्दय़ांवर आम्ही राजकारण करत नाही. लसीप्रकरणी आम्ही पूर्णपणे केंद्र सरकारसोबत उभे आहोत. कुठलीही लस वापरात आणण्यापूर्वी केंद्र सरकारने केवळ याचा प्रभाव जाणून घ्यावा एवढीच सूचना करू इच्छित असल्याचे उद्गार झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी काढले आहेत.









