जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे फर्मानः शासनाला ओमायक्रॉनची धास्ती, विना लस आलात तर पाचशे रुपयांचा दंड
प्रतिनिधी/ सातारा
नव्या येवू घातलेल्या ओमिक्रोनच्या व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ज्या सूचना आलेल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी जिह्यात सुरु करण्यात आली आहे. ज्यांनी लस घेतली नाही अशांना शासकीय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यावर 500 रुपयांचा दंड केला जाईल, त्याकरता ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केलेले आहे. दरम्यान, ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज असून ऑक्सिजन आणि बेडची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. आरटीपीसीआर टेस्टची तपासणी करण्याची क्षमता आपल्याकडे दररोज पाच हजार एवढी आहे. परदेशातून येणाऱयांची माहिती गोळा करण्याचे विमानतळावरच केले जात आहे. त्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना नियमानुसार आयसोलेट व्हावे लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, सध्या कोरोनाचे उपचारार्थ 216 रुग्ण जिह्यात आहेत. ओमिक्रोन हा व्हेरीयंटची अजून भारतात एकही केस कन्फर्म नाही. परंतु डब्ल्यूएचओने सांगितल्यानुसार काळजी घेणे महत्वाचे आहे. ओमिक्रोन हा डॉमिनोट करतो. त्यामुळे दक्षता घेतली गेली पाहिजे. ओमिक्रोनची केस उजेडात यायला पंधरा ते 16 दिवस लागतात. त्यावर रिसर्च सुरु आहे. साऊथ अफ्रिका येथे तिसरी वेव्ह खाली येत असतानाच निष्काळजीपणामुळे ती पुन्हा वर जावू लागली आहे, असे सांगत पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, जिह्यात सुरुवातीला आपल्याकडे आरटीपीसीआर टेस्टची लॅब नव्हती. आता आपल्याकडे दररोज किमान पाच हजार टेस्ट करु शकतो. ऍन्टीजेन टेस्टही केल्या जाणार आहेत. परदेशातून जे लोक येत आहेत. त्यांची विमानतळावर तपासणी करुन त्यांना 15 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवले जात आहे. असे त्यांनी सांगितले.
आरोग्य यंत्रणा तयार
सातारा जिह्यात आरोग्य यंत्रणा तयार आहे. जंबो कोव्हिड हॉस्पिटल हे 31 ऑक्टोबरपासून बंद केले असले तरीही गरज पडल्यास पुन्हा सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर कराड, म्हसवड, पाटण, कोरेगाव आदी ठिकाणी उपचार केंद्रे तयार आहेत. मुलांसाठीही स्वतंत्र उपचाराची सोय करण्यात आली आहे. जिह्यात सध्या 170 मेट्रीक टन एवढा ऑक्सिजन साठा आहे. आजच्या घडीला 60 मेट्रीक टन एवढा तयार होतो आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, औषधांचा कुठेही तुटवडा जाणवणार नाही याचीही तयारी करण्यात आली आहे.








