ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या रणबीरगड येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कर- ए-तोयबाचा टॉपचा कमांडर इश्फाक रशीद खान आणि एजाज अहमद या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. या कारवाईत एक भारतीय जवान जखमी झाला असून, त्याला लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रणबीरगड येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सीआरपीएफ जवानांचे पथक, लष्कराची 29 राष्ट्रीय रायफलसची तुकडी आणि श्रीनगर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम राबवली. दरम्यान, एका ठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. त्याला भारतीय जवान आणि पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांकडील एक एके-47 रायफल आणि पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.









