वृत्तसंस्था/ कोची
भारतीय लष्कर आता हॉवित्झर तोफखाना आणि रॉकेट सिस्टम कमांडसाठी महिला अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. महिला अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी लष्कराने प्रयत्नांना वेग दिला आहे. ऑफिसर्स टेनिंग अकादमीमधून पासआऊट झाल्यानंतर फ्रंटलाईन आर्टिलरी रेजिमेंटमध्ये पाच महिला पॅडेट्सचा समावेश केला जाणार आहे.
ऑफिसर्स टेनिंग अकादमीची पासिंग आऊट परेड 29 एप्रिल रोजी चेन्नई येथे होणार आहे. लष्कराने महिला अधिकाऱ्यांना नेतृत्वाच्या भूमिकेसाठी सक्षम करून सर्वसमावेशकतेकडे वेगाने वाटचाल करता यावी यासाठी बहुस्तरीय प्रशिक्षण प्रणाली राबविली जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ऑपरेशनल, इंटेलिजन्स, लॉजिस्टिक आणि प्रशासकीय पैलूंमध्ये कमांड मजबूत करण्यासाठी महू येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये महिला अधिकाऱ्यांना तयार करण्यासाठी नुकताच एक विशेष ‘सिनियर कमांड’ कोर्स आयोजित करण्यात आला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ओटीए पासिंग आऊट परेडनंतर प्रथमच आर्टिलरी रेजिमेंटमध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे हे मोठे पाऊल आहे.









