काही आठवडय़ांपूर्वी एका कोरोना रुग्ण महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ‘डियर जिंदगी’ या चित्रपटातील ‘लव यु जिंदगी’ हे गाणे ऐकत असताना ती या व्हिडियोमध्ये दिसत होती. या गाण्यामुळे आपल्याला कोरोनासारख्या व्याधीशी झुंजत जिवंत राहण्याची प्रेरणा मिळाल्याचे ती म्हणाली होती.
तथापि, या 30 वषीय महिलेचा दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळेच मृत्यू झाला आहे. हे वृत्त प्रसारित होताच अनेकांचे डोळे पाणावले. ‘लव यु जिंदगी’ म्हणणारी ही महिला अखेर मृत्यूबरोबरचा संग्राम हरली. तिच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांनीच तिच्या मृत्यूची वार्ता प्रसारमाध्यमांवरून सर्वांना कळविली. सलग पंधरा दिवस तिने निर्धाराने कोरोनाशी झुंज दिली. तथापि, नंतर आजार बळावल्याने तिचाही नाईलाज झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचारांची शर्थ करूनही तिचे प्राण वाचले नाहीत. तथापि, ज्या निर्धाराने तिने या दुर्धर व्याधीशी संघर्ष केला, यातून इतरांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असाही संदेश डॉक्टरांनी दिला. कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात नेहमीच पुढे करणाऱया सोनी सूदनेही तिच्या मृत्यूवर अतीव दुःख प्रकट केले. ‘जीवनावर निरातीशय प्रेम करणारी एक महिला अशा करुण रीतीने मृत्यूला सामोरी जाईल, याची कल्पनाही कोणी करू शकत नव्हते. तथापि, हा दुःखद प्रसंग आता आपल्या सर्वांच्या वाटय़ाला आला असून आपण तो सहन केला पाहिजे,’ असा संदेश सोनू सूदने साऱयांना दिला आहे.









