9 प्रकरणे रडारवर : धक्कादायक सत्य समोर येण्याची शक्यता : एसआयटीकडून लवकरच अहवाल सादर
वृत्तसंस्था/ कानपूर
उत्तरप्रदेशातील कानपूर येथील लव्ह जिहादच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करण्यात आले होते. एसआयटीने लव्ह जिहाद प्रकरणांची चौकशी पूर्ण केली आहे. एक आठवडय़ात यासंबंधीचा अहवाल पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांना सोपविला जाणार आहे. याचदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार एसआयटी अहवालात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. कानपूरमध्ये एका विशिष्ट समुदायाचे तरुण स्वतःची धार्मिक ओळख लपवून दुसऱया समुदायाच्या युवतींना प्रेमाच्या जाळय़ात अडकवितात, त्यानंतर त्यांचे ब्रेनवॉश, बळजबरीने धर्मांतर आणि नंतर विवाह होत असल्याचा आरोप आहे.
उत्तरप्रदेशात वाढत्या कथित लव्ह जिहादच्या प्रकरणांवर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कठोर भूमिका अवलंबिली आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर कायदा आणण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर कथित लव्ह जिहादच्या नव्या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. कानपूरमध्ये ऑगस्ट महिन्यात शालिनी यादवची फातिमा होऊन निकाह करणाऱया युवतीने चित्रफित प्रसारित करून खळबळ माजविली होती.
एसआयटीची स्थापना
शालिनी यादवची चित्रफित प्रसारित झाल्यावर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यांवर धाव घेतली होती. अनेक पीडित कुटुंबेही समोर येऊन लव्ह जिहादचा आरोप करत होती. कानपूरमध्ये लव्ह जिहादची मुळे मजबूत होत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना आणि पीडित कुटुंबांनी केला होता. शहरात एक संघटित टोळी सक्रीय असून ती परसमुदायाच्या युवतींना प्रेमाच्या जाळय़ात ओढून बळजबरीने विवाह करत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस महानिरीक्षकांनी लव्ह जिहादच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली होती.
23 पैकी 14 प्रकरणे धर्मांतराच्या कक्षेत
धर्मांतराच्या दोन वर्षांपूर्वी नोंद झालेल्या प्रकरणांचीही चौकशी एसआयटी करणार असल्याची घोषणा पोलीस महानिरीक्षकांनी केली होती. धर्मांतराची 12 प्रकरणे यापूर्वी नोंद करण्यात आली होती. तर 11 प्रकरणे मागील तीन महिन्यांमध्ये समोर आली आहेत. एसआयटीने चौकशी करून 14 प्रकरणांना बळजबरेच्या धर्मांतराच्या शेणीत ठेवले आहे. यातील 5 प्रकरणांचा अंतिम अहवालही तयार झाला आहे. उर्वरित 9 प्रकरणांमध्ये एसआयटीला बळजबरीने धर्मांतराचे ठोस पुरावे मिळाले आहेत.
आरोपींना वित्तपुरवठा
मागील 3 महिन्यांमध्ये धर्मांतरांच्या समोर आलेल्या प्रकरणांमध्ये 5 आरोपी एकाच वसाहतीत राहणारे होते, असे आढळून आले आहे. 5 ही आरोपी परस्परांचे मित्र होते. याचबरोबर लव्ह जिहादचे सर्व आरोपी आर्थिकदृष्टय़ा कमकुवत वर्गातील होते. तरीही धार्मिक ओळख लपवून युवतींना जाळय़ात ओढून कथितरित्या बळजबरीने धर्मांतर घडविण्यात आले. आरोपींनी पोलिसांसमोर जिल्हा न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत महागडय़ा वकिलांची फौजच उभी केली आहे. या पार्श्वभूमीवर आरोपींकडे कायदेशीर लढाईसाठी पैसा कुठून आला हा प्रश्न एसआयटीसमोर आहे. एखादी प्रतिबंधित संघटना यामागे आहे का याचा खुलासा एसआयटीच्या अहवालातून होऊ शकतो.
भावनात्मक पद्धतीने ब्रेनवॉश
आरोपी समाजमाध्यमांवर बनावट खाते तयार करून युवतेंशी मैत्री करतात, त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळय़ात ओढतात. यादरम्यान युवक पाण्यासारखा पैसा खर्च करतात. प्रेमाच्या जाळय़ात ओढल्यावर भावनात्मक पद्धतीने युवतींचा बेनवॉश केला जातो. त्यानंतर विविध आमिषे दाखवून स्वतःसोबत नेले जाते आणि बळजबरीने धर्मांतर घडविले जात असल्याचे दिसून आले आहे.









