आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांची माहिती : बेंगळुरात पत्रकारांशी संवाद
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट व्यापक प्रमाणात पसरत असल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करून लवकरच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.राजीव गांधी आरोग्य विज्ञान विश्वविद्यालयात आयोजित जागतिक आरोग्य दिन कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते.
मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना पत्र लिहिले आहेत. त्यानुसार काही दिवसातच मुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविणार आहेत. निवडणुकीच्या प्रचार सभेत 500 जणांना सहभागी होण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे नेते, प्रमुखांनी कोरोना नियमांचे पालन करावे. तसेच आरोग्य खात्याकडूनही काही मार्गसूची जारी करणार येणार असून काही खात्याच्या अधिकाऱयांनी ते अंमलात आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
मार्गसूचीचे योग्यरीत्या पालन न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणले जाईल. चित्रपटगृहात 100 टक्के प्रवेश देण्याची मुदत बुधवारी संपली आहे. मार्गसूचीत कोणतेच बदल न झाल्यास यापूर्वी जारी केलेली मार्गसूची कायम राहिल. सर्व मेडिकल कॉलेज, पॅरा मेडिकल संस्थांमध्ये कोरोनाचे नियम पाळत साध्या पद्धतीने जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यासाठी चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. निरोगी समाजातून अर्थिक प्रगती शक्य आहे, असेही मंत्री सुधाकर यांनी सांगितले.
अन्य पाच जिल्हय़ातही बाधितांची संख्या अधिक
बेंगळूर शहर वगळता अन्य पाच जिल्हय़ातही कोरोनाबाधितांची संख्या मोठय़ा वेगाने वाढत असून याकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली जात असून या जिल्हय़ांना मोठय़ा प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात आहे. अधिकाधिक बाधित असलेल्या जिल्हय़ांमध्ये कोरोना चाचण्या वाढविण्यासह 24 तासात कोरोनाबाधितांचा शोध घेऊन खबरदारी घेण्याचीही सूचना अधिकाऱयांना केली आहे. बेंगळूर वगळता म्हैसूर, गुलबर्गा, तुमकूर आणि बिदर जिहय़ात रुग्णांची संख्या वाढती आहे, असे मंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले.









