प्रतिनिधी / पणजी :
म्हादई आंदोलनाचे स्वरुप दिवसेन दिवस तीव्र होणार असून त्यासाठी सर्व विरोधी राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. हा प्रश्न जागतिक पातळीवर नेण्यासाठी फेब्रुवारी अखेर अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात म्हादई बचाव मेराथॉन आयोजित केले जाईल, अशी माहिती प्रोग्रेसिव्ह प्रंट ऑफ गोवाचे ऍड. ह्रदयनाथ शिरोडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप, मगो, शिवसेना तसेच इतर विरोधी पक्षांना एका मंचावर आणण्याचे काम प्रोग्रेसिव्ह प्रंट ऑफ गोवा करीत आहे.
जग्गी महाराजांसह अमिर खानलाही बोलावणार
सद्गुरु जग्गी महाराज यांनी ज्या प्रमाणे स्नेह रिव्हर अभियान चालवले त्याच प्रमाणे म्हादई बचाव अभियान असेल. त्य़ासाठी सद्गुरुंना गोव्यात आमंत्रित केले जाणार आहे. पाणी फाऊंडेशनचे संस्थापक तथा अभिनेता अमिर खान यांनाही या मेराथॉनमध्ये बोलावले जाणार आहे, असे त्य़ांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
म्हादई अभायरण्य संपवण्यासाठी तेथील वाघांची हत्या करण्याचे हे षडयंत्र आहे. त्यात कर्नाटक आणि गोवा सरकारही सामील असून मुख्यंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, तसेच सनबर्न पार्टीमुळे 3 तरुणांचा मृत्यू झाला त्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
वाघांचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची होती, पण गोव्यातील जंगलात पट्टेरी वाघ नाहीत, अशी भूमिका घेण्याऱया वन खात्याच्या वनपालांना तात्काळ निलंबित करायला हवे, असे ते म्हणाले.
रॅप संगीत सर्वत्र व्हायरल
कबीर नाईक यांनी गायलेले रॅप संगीत सर्वत्र व्हायरल झाले आहे. त्य़ाला गोमंतकीयांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्य़ांनी केले. प्रत्येक गोमंतकीयांनी पंतप्रधानांना पत्र लिहून म्हादईचा प्रश्न त्यांच्या कानी घालावा, असे त्यांनी सांगून पंतप्रधानांना सातत्याने पत्र लिहून म्हादईचा प्रश्न मांडल्याप्रकरणी राजन घाटे यांचे त्यांनी अभिनंदन केले.
यावेळी ऍड. ह्रदयनाथ शिरोडकर यांच्या समवेत राज मळीक, राजन घाटे, रवी हरमलकर, विश्राम परब, ऍड. नारायण सावंत, रत्नाकर म्हार्दोळकर व महेश म्हांबरे उपस्थित होते.