ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय तसेच सर्वच राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली असताना तीन महिन्यानंतर सहा देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तसेच आणखी एक दिलासा देणारी बाब म्हणजे वॉशिंग्टनमधील एका शास्त्रज्ञाने कोरोना लवकर संपेल असा दावा केला आहे.
देशात गेल्या २४ तासांत अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या कोरोनापासून बचावासाठी लसीकरण आणि खबरदारी घेणे एवढेच पर्याय आहेत. महत्वाचं म्हणजे भारतातील लसीकरण मोहिमेला आज एक वर्ष पूर्ण होतंय. भारतात वर्षभरात १५६ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाविरोधात लसीकरण हे सर्वात मजबूत शस्त्र असल्याचं वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद यांनी एएनआयशी बोलताना म्हटलंय. तर, कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच कोरोना संपेल, असंही त्यांनी सांगितलं.