रानी रामपाल हे नाव आता सर्वांच्या परिचयाचं झालं आहे. रानी रामपाल ही भारताच्या महिला हॉकी संघाची कर्णधार. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरूष हॉकी संघाने कांस्य पदक पटकावलं. मात्र भारताच्या मुलींना हे पदक पटकावता आलं नाही. मात्र भारताच्या महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. महिला हॉकी संघ मैदानात पराभूत झाला असला तरी आपल्या लढाऊ बाण्याने त्यांनी भारतीयांनी मनं जिंकली. रानी रामपालच्या खडतर प्रवासाविषयी…
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला हॉकी संघाचा कांस्य पदकासाठीचा सामना पार पडला. या सामन्यात भारताचं कांस्य पदक थोडक्यात हुकलं. मात्र मैदानात दिसली ती भारताच्या वाघिणींची लढाऊ वृत्ती. गरीब घरातून आलेल्या, प्राथमिक सोयीसुविधाही उपलब्ध नसणार्या या सगळ्या मुली. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत, समाजाचा विरोध, प्रचंड संघर्ष करून पुढे आलेल्या या मुलींशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. यावेळी या मुलींच्या डोळ्यांमधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. पराभवाची बोच त्यांना लसू लागली. महिला हॉकी संघाचं नेतृत्त्व करणारी रानी रामपाल भावनाविवश झाली. रानी रामपालचा प्रवास अनेकींना प्रेरणा देऊन जाईल.
रानीच्या घरात पुरेशी वीज नव्हती. डासांमुळे रात्रीची शांत झोपही या कुटुंबाला मिळत नव्हती. दोन वेळचा पोषक आहार ही चैनच होती. दोन वेळचं अन्नही रानीच्या नशिबी नव्हतं. पाऊस पडू लागल्यावर रानीचं घर पाण्याखाली जायचं. त्यांना पुराचा फटका बसायचा. अत्यंत विपरित परिस्थिती. रानीला हे सगळं बदलायचं होतं. रानीचे वडील हातगाडी ओढायचे तर आई घरकाम करायची. त्यांना मुलांसाठी बरंच काही करायचं होतं. शक्य होतं ते त्यांनी केलं. पण परिस्थितीने त्यांचेही हात बांधलेले होते. रानीचे वडील दिवसाला फक्त 80 रुपये कमवायचे. रानीच्या घराजवळ हॉकीचं मैदान होतं. ती खेळाडूंना बघायची. रानीचे हातही शिवशिवायचे. पण वडील तिला हॉकी स्टीक घेऊन देऊ शकत नव्हते. रानी प्रशिक्षकांना हॉकीचे धडे देण्याची विनवणी करायची. पण रानीची कृश देहयष्टी बघून तिला नकार मिळायचा.
पण रानीने जिद्द सोडली नाही. तिला एक तुटकी हॉकी स्टीक मिळाली आणि त्याने ती सराव करू लागली. तिच्याकडे खेळासाठी लागणारे कपडेही नव्हते. मग ती सलवार कमीझ घालून खेळायची. रानीने बर्याच प्रयत्नांनी प्रशिक्षकांना शिकवण्यासाठी तयार केलं. मग तिने घरी सांगितलं. पण मुलींनी घरकाम करावं, स्कर्ट घालून खेळ खेळू नये असं तिला सांगण्यात आलं. मग तिने खूप विनवण्या करून घरच्यांची मान्यता मिळवली. रानीच्या घरी घडय़ाळही नव्हतं. सरावाची वेळ सकाळची होती. मग रानीची आई जागी रहायची आणि आकाशात बघून मुलीला उठवायची. हॉकी अकादमीत प्रत्येक खेळाडूला अर्धा लीटर दूध घेऊन जाणं बंधनकारक होतं. पण रानीला फक्त 200 मिली दूध नेणं परवडायचं. त्यात पाणी घालून ते वाढवलं जायचं. रानीला खेळायचं होतं. या काळात रानीला प्रशिक्षकांची साथ मिळाली. 500 रुपये ही रानीची पहिली कमाई. तिने ती वडिलांच्या हातात दिली. रानीच्या वडिलांनी एवढे पैसे कधीही बघितले नव्हते. रानीला वयाच्या पंधराव्या वषीं तिला राष्ट्रीय संघासाठी संधी मिळाली. रानी खेळत राहिली. महिला हॉकी संघाची कर्णधार झाली. 2017 मध्ये तिने स्वतःचं घर घेतलं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणं हे रानीचं स्वप्नं होतं. हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. पण रानी आणि तिच्या संघाने अनेक मुलींना खेळाकडे वळण्याची प्रेरणा दिली. त्यांनी पदक जिंकलं नाही तर कोटय़वधी भारतीयांची मनं जिंकली. हॉकीकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन दिला. ही ऑलिम्पिक पदकापेक्षाही मोठी कमाई म्हटली पाहिजे.









