ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
लडाखजवळ असलेल्या स्कार्दू हवाई तळावर पाकिस्तानकडून जेएफ-17 ही लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. अनेकदा चीनच्या हवाई दलाकडून पाकच्या या हवाई तळाचा वापर केला जातो.
पूर्व लडाखमधील हिंसक संघर्षावरून भारत-चीनमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशात सकारात्मक चर्चा सुरू आहेत. मात्र, चीनच्या कुरघोड्या काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. चीन पाकिस्तानला भारताविरोधात पुढे करण्याचा प्रयत्न करत आहे.
भारताविरोधात चीन-पाकिस्तान आघाडी बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यादृष्टीने पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील चारही हवाई तळ हाय अॅलर्टवर ठेवले आहेत. तसेच लडाखजवळच्या स्कार्दू हवाई तळावर पाकिस्तानकडून जेएफ-17 ही लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. तसेच पाकिस्तान वायुसेनेकडून आणीबाणीच्या परिस्थितीसाठीचा युद्धसराव केला जात आहे. पाक हवाई दलाचे प्रमुख मुजाहिद अन्वर खान यांनीही या हवाई तळाला भेट देऊन शनिवारी ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. पाकिस्तानच्या या हवाई तळावर चिनी लढाऊ विमानांच्या तैनातीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.









