वृत्तसंस्था/ लेह
चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पहारेदारी करणाऱया आयटीबीपीने लडाखमध्ये स्वतःच्या ‘प्रंटियर’चे नेतृत्व करणाऱया एका नव्या अधिकाऱयाला नियुक्त केले आहे. मणिपूर कॅडरचे 1999 च्या तुकडीचे अधिकारी ल्हारी दोरजी ल्हातू हे आयटीबीपीचे महानिरीक्षक दीपम सेठ यांची जागा घेणार आहेत. सेठ आतापर्यंत लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात दलाची धुरा सांभाळत होते. तेथील आयटीबीपी मुख्यालयाकडून प्रसिद्ध आदेशानुसार उत्तराखंड कॅडरच्या 1995 च्या तुकडीचे भारतीय पोलीस अधिकारी सेठ यांना दिल्ली येथील आयटीबीपी मुख्यालयात स्थानांतरित करण्यात आले आहे.
ल्हातू अलिकडेच आयटीबीपीमध्ये सामील झाले आहेत. यापूर्वी त्यांनी एनआयए आणि विशेष सुरक्षा दलात सेवा बजावली आहे. प्रशासकीय आणि सामरिक आधारावर हे स्थानांतरण करण्यात आले आहे. सेठ आता दिल्लीत आयटीबीपी मुख्यालयात कार्मिक तसेच सतर्कता प्रभाग सांभाळतील. लडाखमध्ये नवे महानिरीक्षक आगामी काही दिवसांमध्ये कार्यभार सांभाळणार असल्याची अपेक्षा आहे.
आयटीबीपी उत्तर-पश्चिम प्रंटियरचा लेह येथे तळ असून सैन्यातील मेजर जनरल पदाच्या समकक्ष महानिरीक्षक स्तरीय अधिकारी याची धुरा सांभाळतो. चीनला लागून असलेल्या 3488 किलोमीटर लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दलाच्या तैनातीची जबाबदारी या अधिकाऱयाकडे असते.
पूर्व लडाखमध्ये तणावाच्या ठिकाणांवरून सैनिकांना हटविण्याची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी चीनसोबत झालेल्या चर्चेत केंद्रीय गृह मंत्रालयाचा प्रतिनिधि म्हणून त्यांनी भाग घेतला आहे. पूर्व लडाखमध्ये मे महिन्यापासून दोन्ही देशांचे हजारो सैनिक शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात तैनात आहेत.









