ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लडाखमधील पेंगाँग त्सो आणि गॅल्व्हान व्हॅलीजवळच्या नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीन सैनिकांमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेजवळ आपले सैनिक वाढवले आहेत.
गॅल्व्हान व्हॅलीजवळ चिनी सैन्याने दोन आठवड्यात 100 तंबू उभारले असून, तिथेच ते बंकर उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. भारतासोबतचा सीमावादाचा संघर्ष चीन वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. भारत आणि चीनमध्ये लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत 3488 किलोमीटरपर्यंत सीमारेषा आहे. 2019 मध्ये चीनने या भागात 54 वेळा घुसखोरी केली आहे. त्यामुळे चीनच्या घुसखोरीवर भारतीय सैनिकांचे लक्ष आहे. आमच्या हद्दीत कोणत्याही प्रकारची घुसखोरी करु देणार नाही, तसेच या भागातील सुरक्षा अधिक काटेकोर करत असल्याचे भारतीय सैन्याने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, 10 मे रोजी उत्तर सिक्कीममधील नाकूला सेक्टरमध्ये भारत-चीन सीमेवर भारतीय लष्कर आणि चिनी पीएलएमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 4 तर चीनचे 7 सैनिक किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये तणाव वाढला होता. त्यानंतर स्थानिक पातळीवरील यंत्रणांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद निवळला होता.









