पहिल्यांदाच ‘के 9-वज्र’ तोफा तैनात- चीनला चोख प्रत्युत्तर ः सैन्यबळ वाढविण्याच्याही जोरदार हालचाली
नवी दिल्ली, लडाख / वृत्तसंस्था
नियंत्रण रेषेवर चीनच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्या आहेत. चीन जवानांची संख्याही सातत्याने वाढवत आहे. इतकेच नव्हे तर शस्त्रास्त्रांची जमवाजमवही सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवरील वातावरण तप्त झाले आहे. चीनकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच आता भारतानेही विस्तारवादी चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. शनिवारी पहिल्यांदाच भारताने लडाखच्या सीमेवर ‘के 9-वज्र’ तोफा तैनात केल्या. हय़ा स्वयंचलित होवित्झर तोफा 50 किलोमीटर अंतरापर्यंत लक्ष्य गाठण्यास सक्षम असल्यामुळे त्या चीनला घातक ठरू शकतात. भारतीय सुरक्षा दल लढय़ाची भक्कम रणनीती आखत असतानाच लष्करप्रमुख नरवणे यांनी “आता आम्हीही धोक्याला सामोरे जाण्यास सज्ज आहोत’’ असा इशाराही दिला आहे.
गलवान खोऱयात मागील वर्षी झालेल्या संघर्षापासून चीन सातत्याने सीमारेषेवर कुरापती काढत आहे. भारतानेही आता अधिक आक्रमक होत चीनच्या सीमेवर तैनात सुरक्षाबळ आणि युद्धसामुग्री वाढविण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. चीनच्या सीमेवरील संभाव्य धोका पाहता भारताने लडाखमधील सैन्यबळ वाढवले आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे चीन आणि पाकिस्तान संदर्भात शनिवारी निवेदनही आले आहे. चीनशी सामना करण्यासाठी आम्ही लडाखला लागून असलेल्या सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा आणि विकास तीव्र केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
चीनकडून वाढत्या कुरापती
नियंत्रण रेषेवरील भारताच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा चीनकडून प्रयत्न होत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी चीनच्या हालचालींविषयी नुकतीच माहिती जारी केली. चीनकडून नियंत्रण रेषेवर कुरघोडी सुरू असली तरी भारतही आपल्या सीमेच्या रक्षणासाठी तयार आहे, असेही त्यांनी सांगितले. याउलट चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते चुनियांग यांनी नियंत्रण रेषेवरील चीनच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या कब्जा करण्याचा भारतीय लष्कर प्रयत्न करत असल्याचा आरोप बुधवारी केला होता. बागची यांनी तो फेटाळून लावला. चीनकडून नियंत्रण रेषेवर हालचाली वाढल्यामुळेच भारतीय लष्कर सतर्क झाले आहे.
‘के 9-वज्र’मुळे सैन्याची ताकद भक्कम
सीमेवर, ‘के 9-वज्र’चा वापर अधिक उंचीच्या भागातही केला जाऊ शकतो. त्याची यशस्वी चाचणीही झाली आहे. हे सैन्याच्या सर्व रेजिमेंटमध्ये समाविष्ट केले जाईल, ज्यामुळे सैन्याची ताकद वाढेल, असा दावा सुरक्षा दलाकडून केला जात आहे.
चालू पंधरवडय़ातच चर्चेची 13 वी फेरी
अलीकडेच चीनने सीमेला लागून असलेल्या भागात सैन्याची तैनाती वाढवली आहे. पूर्व लडाख आणि नॉर्दर्न कमांड व्यतिरिक्त चीनने ईस्टर्न कमांडवर मोठय़ा संख्येने सैन्य तैनात केले आहे. याचदरम्यान भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावरील चर्चेची 13 वी फेरी ऑक्टोबरच्या दुसऱया आठवडय़ात होऊ शकते. आतापर्यंत झालेल्या चर्चेअंती सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी दोन्ही देश आपापल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे तिढा कायम असलेला दिसतो.
दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे थांबवा !
लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचा पाकिस्तानला इशारा
पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधी उल्लंघनाच्या आडून नियंत्रण रेषेवर कारनामे सुरू ठेवले आहेत. हे कारनामे पाकिस्तानने वेळीच बंद करावेत. दहशतवाद्यांच्या घुसखोरीला प्रोत्साहन देणे न थांबल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी पाकिस्तानला दिला आहे. मागील आठवडय़ातच उरीमध्ये घडलेल्या दोन घटनांचा संदर्भ देत त्यांनी पाकिस्तानचा कडक शब्दात समाचार घेतला. यावषी फेब्रुवारी ते जूनच्या अखेरीपर्यंत पाक लष्कराने युद्धबंदीचे उल्लंघन केले नाही, मात्र अलीकडेच शस्त्रसंधी उल्लंघनात घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत दोन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यानही घुसखोरीचे प्रमाण वाढले होते, असे नरवणे म्हणाले.
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवाया आणि नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नांना पाकिस्तानी सैन्याकडून पाठबळ मिळत असल्याचे ते पुढे म्हणाले. पाकिस्तान आणि चीन यांच्या कुरापतींबरोबरच अफगाणिस्तानसंबंधीही त्यांनी महत्त्वाचे भाष्य केले. आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि भारतावर होणाऱया परिणामांवर लक्ष ठेवून आहोत. भविष्यात काय परिस्थिती असेल हे आताच सांगणे अतिघाईचे ठरेल, असे ते म्हणाले.