चीनला धडकी : पूर्व लडाखमध्ये चीन सीमेवर अत्याधुनिक टी-90, टी-72 रणगाडे तैनात
लडाख / वृत्तसंस्था
भारत आणि चीनमधील तणाव निवळत नसल्यामुळे भारतीय सैन्याने पूर्व लडाखमध्ये टँक रेजिमेंट (रणगाडे) मैदानात आणून चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच चीनने डोकलामजवळ अणुबॉम्बर आणि अण्वस्त्रवाहू विमाने तैनात केल्याची माहिती उजेडात आल्यानंतर आता भारतही सुसज्ज झाला आहे. पूर्व लडाखमधील सीमेवर तैनात करण्यात आलेल्या टँक रेजिमेंटमध्ये ‘भीष्म’, ‘अर्जुन’सह अत्याधुनिक रणगाडय़ांचा समावेश आहे. या रणगाडय़ांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धासाठी सज्ज होण्याची क्षमता आहे.
पूर्व लडाखमधील सपाट भागात रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. लडाख भाग हा पर्वतरांगांचा भाग आहे. ताबारेषेच्या पलीकडे अक्साई चीनचा पठारी भाग आहे. यावर रणगाडे सहजपणे धावू शकतात आणि युद्धात कामी येऊ शकतात. भारताच्या या सुसज्जतेमुळे प्रतिस्पर्धी चीनला धडकी भरु शकते. तसेच आता युद्धजन्य स्थितीत चीनच्या हद्दीत घुसून कारवाई करण्यास भारत मागे हटणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र असणाऱया या भागात अत्याधुनिक रणगाडे तैनात करून भारताने चीनला एकप्रकारे इशारा दिला असून कोणत्याही आगळीकीला तोंड देण्यात तयार असल्याचे दाखवून दिले आहे.
पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य गेल्या 5 महिन्यांपासून आमनेसामने आहे. कमांडर स्तरावरील अनेक बैठका होऊनही चीन मागे हटण्यास तयार झालेला नाही. त्यामुळे आगामी हिवाळी हंगाम पाहता भारताने पूर्ण तयारी केली आहे. दीर्घकाळ येथे टिकून राहण्यासाठी सैनिक, रसद उतरवली जात असून चीनच्या धमक्मयांना भीक न घालता आता टी-90 आणि टी-72 रणगाडे तैनात केले आहेत. लष्कराने पूर्व लडाखमधील एलएसीवर हे युद्धसज्ज रणगाडे तैनात केले आहेत. 14,500 फूट उंचीवर असणाऱया चुमार-डेमचोक भागात रणगाडय़ांची रेजिमेंट तैनात करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली. तसेच बीएमपी-2 कॉम्बॅक्ट व्हेईकल्सही येथे रवाना करण्यात आली आहेत.
उणे 40 तापमानातही लढय़ासाठी सक्षम…
पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आलेले टी-90 आणि टी-72 रणगाडे उणे 40 अंश तापमानातही सक्षमपणे चालवले जाऊ शकतात. हिवाळय़ाच्या दिवसांमध्ये येथे हिमवृष्टीस सुरुवात होताच तापमान ‘उणे’मध्ये जाते. या परिस्थितीची पूर्वकल्पना असल्यामुळेच भारतीय सुरक्षा दलाने आताच हे रणगाडे येथे तैनात केले आहेत. लडाखमध्ये थंडीच्या हंगामात वातावरण खराब होते. मात्र याचा सामना करण्यास भारत तयार आहे. रणगाडे, शस्त्रपुरवठय़ाबरोबरच सैनिकांसाठी आवश्यक असलेले उच्च कॅलरीजयुक्त आणि न्युट्रीशनयुक्त रेशन येथे यापूर्वीच दाखल झाले आहे. तसेच आवश्यक इंधन, तेल, थंडीचे कपडे, वातावरण गरम ठेवण्यासाठीची उपकरणेही ठिकठिकाणी पोहोचवण्यात आली असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱयांनी दिली.
रणगाडय़ांच्या मेन्टेनन्सचे आव्हान
थंडीच्या दिवसात या भागात तैनात केलेले रणगाडे, वाहने आणि अन्य यंत्रसामुग्रीचे मेन्टेनन्स करण्याचे मोठे आव्हान असते, असे मेजर जनरल अरविंद कपूर यांनी सांगितले. थंडीच्या दिवसात येथे रात्रीचे तापमान उणे 35 अंशांच्या खाली जाते. यासह थंडगार वारेही असल्याने शस्त्रास्त्रे, रणगाडे, बंदुका, वाहनांची व्यवस्थित निगा राखण्याची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे ‘फायर अँड फ्युरी कॉर्प्स’ची विशेष तुकडीही येथे तैनात करण्यात आली आहे.









