सैनिक, रणगाडय़ांची वाहतूक सोपी ठरणार : शत्रूच्या नजरेपासून दूर
वृत्तसंस्था/ लडाख
पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर सैन्य आणि रणगाडय़ांच्या वेगवान हालचालींसाठी लडाखपर्यंत एका महत्त्वाच्या रस्त्याची निर्मिती केली जात आहे. मनालीपासून लेहपर्यंत निर्माण होणाऱया या मार्गामुळे सैन्याच्या हालचालींना मोठा वेग मिळणार आहे. तसेच या मार्गावरील हालचालींवर शत्रूही नजरही पडू शकणार नाही.
भारत मागील 3 वर्षांपासून उत्तर भागात सामरिकदृष्टय़ा महत्त्व बाळगणाऱया दौलत बेग ओल्डी आणि अन्य ठिकाणांना जोडण्यासाठी पर्यायी मार्गांवर काम करत आहे. जगातील सर्वात उंचावरील मार्गाचे खारदुंग ला खिंडीनजीक कामही सुरू झाले आहे. सद्यकाळात जोजिला खिंडीद्वारे मनालीहून लेहपर्यंत जाता येते.
नव्या मार्गनिर्मितीमुळे मनाली येथून लेह येथे जाण्यासाठीचा 3-4 तासांचा वेळ वाचणार आहे. याचबरोबर सैनिकांची तैनात, रणगाडय़ांच्या वाहतुकीदरम्यान पाकिस्तान अन्य कुठला शत्रू या हालचालींवर नजर ठेवू शकणार नाही.
वाहतुकीसाठी प्रामुख्याने जोजिला मार्गाचा वापर केला जातो आणि तो द्रास-कारगिलमार्गे लेहपर्यंत जातो. कारगिल युद्धादरम्यान याच मार्गाला पाकिस्तानने लक्ष्य केले होते. पाकिस्तानी सैनिकांनी उंच पर्वतांवरून रस्त्यानजीक गोळीबार केला होता. याच कारणामुळे पर्यायी मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे.









