दिल्ली/प्रतिनिधी
बुधवारी लडाखच्या दहा सदस्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. लडाखची अवघड भौगोलिक परिस्थिती आणि रणनीतिक महत्त्व लक्षात घेता, लडाखची भाषा, संस्कृती आणि भूमीचे संरक्षण, लडाखच्या लोकांचा विकासामध्ये असलेला सहभाग, रोजगाराची उपलब्धता आणि लोकसंख्या स्वरूपातील बदल या संदर्भात सर्व प्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली. लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या निवडणुकीपूर्वी या संदर्भात निषेधही करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एक बैठक झाली. लडाखची भाषा, लडाखची संस्कृती आणि लडाखमधील जमीन संवर्धनाशी संबंधित विषयांवर योग्य तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांच्या नेतृत्वात समिती गठीत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
गृहमंत्र्यांना भेटलेल्या प्रतिनिधी मंडळाचे सदस्य, लडाखमधील निवडलेले सदस्य, लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिलचे सदस्य आणि भारत सरकारचे प्रतिनिधीत्व करणारे माजी पदाधिकारी आणि लडाख प्रशासन यांचा या समितीत समावेश असणार आहे.
सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नावर यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेवर या समितीचे सदस्य विचार करतील आणि अंतिम निर्णय घेताना या समितीच्या मतांची दखल घेण्यात येईल, असे म्हंटले आहे.