जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत 31 मार्चपर्यंत वाढविली
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. लग्न समारंभाला फक्त 50 नागरिकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचे उल्लंघन केल्यास हॉल मालकावर फौजदारी गुन्हा दाखल करुन हॉल बंद केला जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले.ऑ
जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशा नुसार यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या व प्रतिबंधित केलेल्या बाबी व क्षेत्रे कायम ठेवण्यात आली आहेत. तसेच यापूर्वी प्रतिबंधित केलेली क्षेत्रे व सुट दिलेली क्षेत्रे कायम ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर सर्व सिनेमागृहे, सर्व शॉपिंग मॉल्स, शाळा, कोचिंग क्लासेस, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, ऑटे रिक्षा, खासगी प्रवासी बसेस, गृह अलगीकरण, सर्व शासकिय कार्यालयातील उपस्थिती, पर्यटनस्थळे आदींसाठी ज्या नियम व अटींवर परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार अंमलबजावणी करावी. त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
लग्न समारंभाला फक्त 50 नागरिकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी राहणार आहे. या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित हॉल मालकावर फौजदारी गुन्हा दाखल होणार असून हॉल बंद करण्यात येईल. तसेच कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणुका, संमेलने, यात्रा, उत्सव, ऊरुस याच्या आयोजनाला बंदी घालण्यात आली आहे. उल्लंघन करणार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. अंत्यविधी व अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी फक्त 20 नागरिकांनाच परवानगी राहील, असे जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.









