पहिल्या प्रयोगापासून ते आजतागायत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक संगीत नाटक आहे. त्याचीच सुरुवात या ’लग्नाला जातो मी’ या उत्कंठावर्धक गाण्याने होते. नारदाचे पात्र आणि अर्जुनाचे पात्र यातला संगीतमय संवाद इतका वेगवान आहे की पाहणारेही जीव हातात घेऊन पाहतील. कारण लग्नाला जातो मी द्वारकापुरा, जातो द्वारकापुरा नंतर देतो निजभगिनी राम..ही ओळ ते नारदमुनी इतक्या विविधतेने फिरवत असतात की स्वतः सव्यसाची धनुर्धर असलेल्या अर्जुनावर शरसंधानच केल्यासारखे. पं. रामदास कामत आणि रवींद्र कुळकर्णी यांच्यातली ती जुगलबंदी यूटय़ूबवर पाहिल्यावर खरंतर उत्सुकता अती ताणून रडकुंडीला आलेला अर्जुन पाहून हसूच लोटावं! नारदमुनींसारख्या त्रिभुवनसंचारी असलेल्या तत्कालीन पत्रकार मुनिवर्यांना स्वतःची उत्कंठा दाखवून दुसऱयाची उत्सुकता ताणून धरण्याचे तंत्र अवगत असायचेच. त्यात नवल नाही. पण या निमित्ताने एक विषय समोर येतोच. तो म्हणजे असे आधुनिक नारदमुनी आपल्याला जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा काय काय मजा उडते! प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यावर जो काही आनंद मिळायचा किंवा जी काही मजा उडायची ती उडेल. पण जेव्हा त्या गोष्टीचे रसभरित वर्णन केले जाते तेव्हा कल्पना करूनच मनुष्याचे मन किती आनंद मिळवते आणि सध्या अशी मजा, असा आनंद सर्व कलाप्रेमी, कलाकार, रसिक अशा सर्वांना मिळू लागलेला आहे. तो कसा म्हणाल तर गेले एक वर्ष आपण सगळेच कोरोनाच्या आकाशीच्या घावाने असे काही टेकीस आलो होतो! मरुदे ते मनोरंजन आणि बासनात गुंडाळून राहू देत ती थेटरं आणि सभागृहं, जगलो वाचलो आणि पोटात गोळाभर अन्न पडलं की पुरे रे देवा असे झाले होते. पण हळूहळू माणसे याही परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकली. हळूहळू लढायलाही शिकली. पहिले काही महिने सर्व कलाकारांनी अचानक मिळालेला वेळ भरपूर रियाजाने सत्कारणी लावण्यात खर्च केला.
स्वतःच्या रियाजाकडे, प्रगतीकडे तटस्थपणे पाहिले. कितीतरी जुन्या नव्या गोष्टी घटवल्या. त्यातही काही जिद्दी मंडळींनी विविध ऍप्स वापरून दूरसंपर्क करून तालमी केल्या. एकूण वेळ सत्कारणी लावण्यात आला. शिवाय रोजचे जगणे तर होतेच. जेव्हा जगण्याची उमेद कमी कमी होत चालली होती आणि प्रियजनांनाही भेटता येत नव्हते त्यावेळी कितीतरी लोकांना जुनी नवी रेकॉर्डिंग जगवत आणि तगवत होती. कित्येक लोकांना या संगीत, नाटक या गोष्टींनी जगण्याची उमेद दिली होती. ज्या अतीव बिझी असणाऱयांना वर्षानुवर्षे आपल्या आवडीचे काही ऐकता, पाहता आले नव्हते, त्यांनी मिळालेला थोडाबहुत वेळ ते करून सार्थकी लावला. भविष्याचे भूत अक्षरशः शून्य समोर ठेवून उभे असतानाही ज्या गोष्टी जगायला प्रेरित करत राहिल्या त्यात कोणत्याही कलेचा (अगदी नकलेचाही) पहिला नंबर लागेल. तसेही अस्मानी आणि सुलतानी यातून जे मागे राहते ते कलाधनच असते. आणि कलाकारांची अवस्था यावेळी काय बरं असेल? तीही माणसेच होती. त्यांनाही जगायचे होते. त्यासाठी कमावणे प्राप्त होते. त्यापैकी जे लोक जोडउद्योग करणारे होते ते चांगले तरले पण जी कुणी मंडळी पूर्णवेळ कलाकार होती, त्यांची मात्र या संकटाने पार दैना करून सोडली. विशेषतः जे नवीन किंवा मध्यमवर्गीय व्यावसायिक कलाकार होते ते जास्त होरपळले. कारण अती मोठय़ा पातळीवरील कलाकारांनी बऱयाचअंशी आधीच इतकी संपत्ती अर्जित केलेली असते की त्यांच्यापुढे किमान जगायचे कसे हा प्रश्न नव्हता. अशावेळी सर्वजण एकाच गोष्टीची वाट पाहत होते. ती म्हणजे ही संचारबंदी कधी संपेल आणि कोरोना कधी निष्प्रभ होईल. अशावेळी सर्वात महत्त्वाची एक गरज शमेनाशी झाली होती. ती म्हणजे कलाकारांची लाइव्ह स्वरूपात लोकांसमोर व्यक्त होण्याची. आणि लोकांची गरज होती ती कार्यक्रम प्रत्यक्ष किंवा लाइव्ह ऐकण्याची.
मग जिद्दी लोकांनी ऑनलाईन कार्यक्रम सुरू केले. शहरातलीच नव्हे तर गावोगावची छोटी मंडळेही जागी झाली. समाजमाध्यमांवर अशा आभासी कार्यक्रमांच्या जाहिराती झळकू लागल्या. त्यांच्या सशुल्क प्रवेशिका मिळू लागल्या. त्यांची जोरदार खरेदीही सुरू झाली. धडपडत, नेट मिळवत श्रोते ऑनलाईन हजर राहायला लागले आणि हळूहळू हे नवीन व्यवहार सवयीचे व्हायला लागले. आपल्या खंडप्राय देशात, खेडय़ातल्या मुलांना एरवी शिकवणीसाठी उपलब्ध न होणारी कलाकार मंडळी व्हर्चुअल लेव्हलवर उपलब्ध व्हायला लागली. प्रत्यक्ष समोर हजर न राहताही गाणे, नर्तन व इतर प्रकार प्रभावीपणे शिकता येतात हे अनेकांना पटले. त्यातून पुन्हा नवीन संधी निर्माण झाल्या. जगाबरोबरच हळूहळू या क्षेत्राचाही चेहरामोहरा झपाटय़ाने बदलू लागला. फार फार प्राचीन काळात देवदानवांमध्ये झालेले अमृतमंथन काय असेल याची झलक अनुभवायला मिळाली. पण शेवटी प्रतीक्षा होती ती सारे काही पूर्ववत होण्याची. कारण माणसाला शेवटी स्थैर्य हवे असते.
या काटेकोर अंमलबजावणीची गोड फळे नजरेच्या टप्प्यात आली. माणसे हळूहळू घराबाहेर पडू लागली. संचारबंदी टप्याटप्याने उठवली गेली. अटी शर्तींसहित प्रत्यक्ष कार्यक्रमांना परवानगी मिळू लागली आणि मग सुरू झाली एकच लगीनघाई. गेले कितीतरी दिवस नियमित होणाऱया संगीत सभा बंद होत्या. नवीन सुरू केलेले संगीत उत्सव, महोत्सव बंद होते. अक्षरशः देवसेवाही बंद होत्या. कोल्हापूरच्या आईसाहेब अंबाबाई असोत किंवा जलंधरचे हरिवल्लभ असो. अक्षरशः सगळे संगीतदालन रिक्त होते. पण एकदा जनजीवन सुरळीत होऊ लागले आणि मग कार्यक्रमांची बहारच उडाली. प्रदीर्घ मुदतीनंतर होणाऱया या आनंदोत्सवाचा आनंद काय घेऊ आणि किती घेऊ असे होणारच! एकाचवेळी कृष्णावेणी महोत्सव, विविध कीर्तन महोत्सव, रत्नागिरीतील बहुचर्चित थिबा महोत्सव, कल्याणमधील देवगंधर्व महोत्सव जाहीर झाले भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि मोठय़ा कौतुकाने, गाजावाजात म्हणण्यापेक्षा खऱया अर्थाने वाजत-गाजत पारही पडू लागले. आणि शेवटी जीवाला शिव भेटला. आपल्या आवडत्या संगीत समारंभाची बातमी येणे, मग त्याची जाहिरात वाचायला मिळणे, मग प्रवेशिका मिळण्यासाठी खटपट करणे, त्यात कोण कोण कलाकार बसणार आहेत याची उत्सुकता, मग जाण्यासाठी तयारी, अगदी ठेवणीतले कपडे अलंकार बाहेर निघणे ते लांबलाबून गाडय़ा काढून रसिकांनी कार्यक्रम स्थळी गर्दी करणे यात जी काही मजा असते ना! म्हणतात ना, लग्नापेक्षा तयारीची मजा आणि वधूवरांपेक्षा करवलीचा गाजावाजा हा जास्तीच असतो! म्हणूनच लग्नाला जातो मी म्हणणाऱया नारदासारखीच सगळय़ा लोकांची अवस्था झाली. उत्कंठा, आनंद, हुरहूर यांचेही तितकेच मनोज्ञ संमेलन भरले. कलाकारांनाही श्रोत्यांना प्रत्यक्ष रिझवण्याची संधी मिळाली आणि धन्य वाटले. हा आनंद असाच उत्तरोत्तर वाढत जावो हीच त्या नटराजाकडे विनम्र प्रार्थना!
अपर्णा परांजपे-प्रभु – 8208606579








