– बंदमध्ये महाविकास आघाडीची एकजूट –शहरासह जिह्यात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद
प्रतिनिधी/कोल्हापूर
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलाने आंदोलनकर्त्या शेतकऱयांची हत्या करण्यात करून शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ आणि दिवंगत शेतकऱयांना आदरांजली वाहण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने सोमवारी महाराष्ट्र बंद करण्यात आला. त्यानुसार रविवारी रात्री 12 वाजल्यापासून बंद सुरु झाला. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सकाळी साडेनऊ वाजता शिवाजी चौकात एकत्र येऊन भाजप सरकारचा तीव्र निषेध केला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
बंदच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजी चौकात एकत्र आले. शहरचे आमदार चंद्रकांत जाधव, शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, आदील फरास, राजेश लाटकर, जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा संध्या घोटणे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर, वैशाली महाडिक, हेमलता माने, लिला धुमाळ, सरीता मुजावर, उज्वला चौगले, शुभांगी साखळे, सुनिल देसाई, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, निरंजन शिंदे, रमेश पोवार, भरत रसाळे, अशोक जाधव, दादासो लाड आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी केंद्रातील भाजप सरकारचा निषेध असो, शेतकऱयांना चिरडणाऱया भाजपचा धिक्कार असो, आदी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. आपल्या पक्षाचे झेंडे हातात घेऊन, गळ्यात पक्षाचा मफलर घालून कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
मोटरसायकल रॅलीद्वारे बंदचे आवाहन
सकाळी 10 वाजता शिवाजी चौकातून महाविकास आघाडीच्या रॅलीला सुरवात झाली. महापालिका, महाराणा प्रताप चौक, आयोध्या टॉकीज, लक्ष्मीपुरी, उमा टॉकीज, बागल चौक, राजारामपुरी, परीख पुल, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक, पापाची तिकटी, माळकर तिकटी मार्गे पुन्हा शिवाजी चौक अशी रॅली काढून व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
दुकाने सुरू असल्यावरून तणाव
दाभोळकर कॉर्नर येथील एक नामवंत चहा विक्रीचे दुकान सुरू होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. एका कार्यकर्त्यांने दुचाकीवरून उतरून शटर खाली ओढून दुकान बंद केले. याचबरोबर दसरा चौकातील वडा विक्रीचे दुकान सुरू होते. त्यांनाही कार्यकर्त्यांनी बंद करण्यास भाग पाडले. पापाची तिकटी ते गंगावेश मार्गावरून रॅली जाताना शिवाजी मार्केटमधील भांडी विक्रीचे दुकान सुरू होते. तेही कार्यकर्त्यांनी बंद पाडले. यावेळी काहीकाळ तणावपूर्ण वातावरण होते. कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेळोवेळी पोलीसांनी हस्तक्षेप केला.
चेंबर ऑफ कॉमर्सचा बंदला पाठींबा
चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे यांनी शिवाजी चौकात येऊन बंदला पाठींबा दिला. शहारातील सर्व दुकाने, व्यवसाय बंद ठेवून महाविकास आघाडीच्या आवाहनास पाठींबा दिला.
बंदला विरोध करणाऱया व्यापारी संघटना प्रतिनिधीला शिवसेनेकडून दम
व्यापाऱयांच्या राज्य शिखर संघटनेच्या स्थानिक पदादाकाऱयाने बंदला विरोधला होता. त्यानुसार राजारामपुरी येथील काही व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभागी न होता आपली दुकाने सुरु ठेवली होती. याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार व विजय देवणे यांना समजली. त्यामुळे त्यांनी राजारामपुरी येथे व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱयाच्या दुकानात जाऊन दम दिला. बंदला गालबोट लावू नका, अन्यथा शिवसेना स्टाईलने दुकाने बंद केली जातील असा इशाराही सेनेच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांनी दिला. त्यानंतर राजारामपुरी परिसरातील काही सुरु असलेली दुकाने बंद झाली.
बंदला लोकराज्यचा पाठींबा
उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे शेतकऱयांच्या मोर्चामध्ये गाडी घालून अनेक शेतकऱयांना चिरडून ठार मारण्याचे कृत्य भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने केले. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. शिवाजी चौकात लोकराज्यचे अध्यक्ष अनिल चव्हाण, अशोक तोरसे, अमोल कांबळे, संतोष बिसुरे, हिंदुराव पोवार आदि उपस्थित होते.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीची भाजप विरोधात निदर्शने
लखीमपूर घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. शेतकऱयांचा मृत्यू आणि हिंसाचारामुळे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पीपल्स रिपल्बिकन पार्टीने (कवाडे) पाठिंबा दिला. दसरा चौकात केंद्र सरकार, भाजपविरोधात निषेध नोंदविला. यावेळी जिल्हाध्यक्ष डी. जी. भास्कर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळे, शहाराध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांनी निदर्शने केली.