ऑनलाईन टीम / नवी मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लखीमपूर खेली प्रकरणावरून केंद्रावर निशाणा साधला आहे. पवार यांनी यावेळी लखीमपूर खेरीसंदर्भात स्पष्ट झालेल्या माहितीवरुन एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, रस्त्याने जाणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांच्यावर काही लोक गाडीतून येत त्या लोकांना गाडीतून धक्के देतात आणि त्यात चार शेतकरी आणि इतर २-३ लोकांची हत्या झाली. त्यात एक पत्रकार देखील होते. यावेळी उपस्थित काहींनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे पुत्र त्या गाडीत होते असे सांगितले आहे.
यावर कारवाई करावी या मागणीला उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने दिला नाही. ८ दिवसांनंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर दखल घेत गृहराज्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना अटक करण्याची कारवाई पोलिसांनी केली. याला भाजपचंच सरकार असलेल्या उत्तर प्रदेश सरकारला अटक करावी लागली. त्यामुळे आवश्यक असलेला पुरावा त्यांच्या हाती लागलेला असावा हे स्पष्ट आहे.
सत्ताधारी पक्षानं यात भूमिका घेणं आवश्यक होतं. पहिल्यापासून यात सत्य नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. या प्रकरणात बघ्याची भूमिका घेणं, अपराध्यासंबंधी वेळीच उपाययोजना न करणं याची जबाबदारी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही. त्यामुळेच गृहखात्याची जबाबदारी राज्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे आहे, त्यांना अजिबात टाळता येणार नाही. म्हणून त्यांनी आपल्या पदावरून दूर व्हावं. त्यामुळे लोकांचा कायदा-सुव्यवस्था, शासनाबाबत विश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे.









