ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचाराचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक जीप कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडताना दिसत आहे. भरधाव जीपने धडक दिल्याने काही लोक जखमी झाले. एका शेतकऱ्याला जीपने धडक दिल्यानंतर त्याने बोनेटवर उडी मारली त्यानंतर तो जमिनीवर पडला. या जीपच्या मागे एक एसयुव्ही कारही असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
काँग्रेसशिवाय आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग आणि इतर विरोधी पक्षांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, या हिंसाचारात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये गाडीखाली चिरडून मृत्यू झालेल्या 4 शेतकऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









