केंद्राच्या अध्यादेशाच्या विरोधात मागणार समर्थन
वृत्तसंस्था/ लखनौ
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बुधवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची लखनौमध्ये भेट घेणार आहेत. केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या विरोधात केजरीवाल हे समाजवादी पक्षाकडून समर्थन मागणार आहेत. केजरीवालांनी यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे.
दिल्लीतील शासकीय अधिकाऱ्यांवर निवडून आलेल्या सरकारचे नियंत्रण राहणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी दिला होता. सर्वोच्च न्यायालाच्या निर्णयाच्या 7 दिवसांनी केंद्र सरकारने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंबंधी अध्यादेश काढला होता. या अध्यादेशानुसार दिल्लीत अधिकाऱ्यांच्या नियुक्ती तसेच बदलीचा अंतिम निर्णय उपराज्यपालांचा असणार आहे. यात मुख्यमंत्र्याला थेट अधिकार नसेल.









