70 देशांचा सहभाग; 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा
ऑनलाईन टीम / लखनऊ :
आशिया खंडातील सर्वात मोठे संरक्षणविषयक शस्त्रास्त्र प्रदर्शन आजपासून सुरू होत आहे. या प्रदर्शनात चीन व पाकिस्तान वगळता 70 देश सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, 25 देशांचे पंतप्रधान या प्रदर्शनाला हजेरी लावणार आहेत. 165 शस्त्रास्त्र कंपन्या आपले सादरीकरण करणार आहेत. यामध्ये नौदल, हवाई दल आणि पायदळाचा सराव पहायला मिळणार आहे.
या प्रदर्शनाची संकल्पना ‘भारत ः संरक्षणातील उदयोन्मुख हब’ अशी ठेवण्यात आली आहे. अमेरिकेतील एअरोस्पेस कंपनी लॉकहीड मार्टीनचे आधुनिक एफ-35 लढाऊ जेट, युरोपीयन कंपनी एअरबस सी-295 विमान पहायला मिळणार आहेत. भारताचे तेजस, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग ऍन्ड कन्ट्रोल सिस्टिम, मानवरहित ड्रोन रुस्तुमसह ऍडव्हान्स्ड पायलटलेस हेवी ड्रॉप सिस्टिम, निर्भय हे क्षेपणास्त्र देखील प्रदर्शनात मांडले जाणार आहेत.
प्रदर्शनात 54 देशांत तयार व सुटय़ा भागांच्या खरेदीसाठी सामंजस्य करार होणे अपेक्षित आहे. अंदाजे 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची या प्रदर्शनातून अपेक्षा आहे. 8 व 9 फेब्रुवारी रोजी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.









