वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या पुरुष एकेरीच्या ताज्या मानांकनात राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेता भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.
या मानांकनात लक्ष्य सेन यापूर्वी आठव्या स्थानावर होता. अलीकडच्या कालावधीत लक्ष्य सेनने विविध आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये कामगिरीत सातत्य राखत चांगले यश मिळवल्याने मानांकनात त्याचे स्थान दोन अंकांनी वधारले. 25 स्पर्धांमध्ये त्याने 76,424 गुण मिळविले आहेत. पुरुष दुहेरीच्या मानांकनात भारताची अव्वल जोडी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी सातवे स्थान मिळविले आहे. सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी अलीकडेच प्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद मिळविले आहे. भारताच्या या जोडीने विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूरवरील दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. या जोडीने इंडिया खुल्या सुपर 500 दर्जाच्या स्पर्धेमध्ये दुहेरीचे विजेतेपद तसेच बर्मिंगहॅममधील स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. भारताच्या महिला बॅडमिंटनपटू ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या मानांकनात 23 वे तर इशान भटनागर व तनीषा क्रेस्टो यांनी मिश्र दुहेरीच्या मानांकनात 28 वे स्थान मिळविले आहे. महिला एकेरीत भारताची दुहेरी आणि ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू पाचव्या स्थानावर असून पुरुष एकेरीत भारताचे किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय हे अनुक्रमे अकराव्या आणि बाराव्या स्थानावर आहेत.









