वार्ताहर/ पुसेसावळी
शनिवारी रात्री लक्ष्मीपूजनानंतर चोरटय़ांनी शहाजी आत्माराम माळी यांच्या घरात धाडसी चोरी केली. घराच्या मागील बाजूने घरात घुसून दरवाजे उघडून घरातील लक्ष्मीपूजन केलेले घंटण, चेन, अंगठय़ा, कर्णफुले, बोरमाळ, इत्यादी सुमारे 11 तोळे सोने, चांदीचे दागिने व 15 हजार रुपयांची रोकड चोरटय़ांनी लंपास केली.
ऐन दिवाळीच्या दिवशीच चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्रीच सुमारे पावणे चार लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केल्यामुळे पुसेसावळीत चोरटय़ांची दहशत निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री कराड रोडच्या दक्षिणेस असलेला बंगला फोडून चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. परंतु, त्याबाबत संबंधितांनी कोणतीही तक्रार पोलिसांत दिली नाही. पोलिसांनी सदर घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली.
तातडीने साताऱयाहून श्वान पथक बोलविण्यात आले. परंतु, खंडोबा मंदीर ते पोष्ट ऑफिस दरम्यान ते घुटमळले. ठसे तज्ञांना पाचारण करुन संबंधित ठिकाणाचे ठसे घेण्यात आले आहेत. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांनी भेट देवून पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे करीत आहेत.








