वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया लक्ष्मीनगर परिसरातील भंगीबोळामध्ये मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून हिंडलगा ग्रा. पं. च्या अध्यक्ष व अधिकाऱयांनी पाहणी करून त्वरित अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.
याबाबत लक्ष्मीनगर परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार येथील लक्ष्मी मंदिराच्या समोरील बाजूला असलेल्या दोन्ही ठिकाणच्या भंगीबोळामध्ये परिसरातील रहिवाशांनीच अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. त्यामुळे सुमारे 12 ते 15 फुटी रुंदी असलेले भंगीबोळ आता फक्त तीन ते चार फुटांचेच शिल्लक राहिले आहेत. शिवाय भंगीबोळाच्या मधोमध गटारीचे बांधकाम करून सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली आहे. काही रहिवाशांनी गटार देखील बंद करून त्यावर बांधकाम करत संरक्षक भिंती बांधल्या आहेत. परिणामी गटारीतील सांडपाण्याचा व्यवस्थितरित्या निचरा होत नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पाणी साचल्याने डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई करून भंगीबोळातील अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. याचा नाहक त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. शिवाय सांडपाणी घराशेजारी झिरपत असल्याने विहिरी व कूपनलिकांचे पाणी देखील दूषित बनण्याचा धोका आहे. यासाठी ग्रा. पं. अध्यक्ष व अधिकाऱयांनी त्वरित पाहणी करून भंगीबोळात झालेले अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.









