कॅल्शियम, ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता तसंच अन्य कारणांमुळे महिलांमध्ये हाडांशी संबंधित तक्रारी वाढत चालल्या आहेत. सध्या आर्थ्रायटिसचं प्रमाण वाढत चाललं आहे. या आजारात सांध्यांमध्ये सूज येऊ लागते. आर्थ्रायटिसच्या तीव्रतेनुसार लक्षणं वेगळेवेगळी असतात. या लक्षणांनुसार रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र आजाराची सुरूवात होत असताना ठराविक लक्षणं दिसू लागतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. कोणती आहेत ही लक्षणं? जाणून घेऊ या.
* आर्थ्रायटिसच्या प्राथमिक टप्प्यात सांधेदुखी, गुडघेदुखीच्या तक्रारी निर्माण होतात. यामुळे सुलभनेते हालचाल करता येत नाही. वेळीच औषधोपचार झाले नाहीत तर सांधेदुखी वाढू लागते आणि हालचाल करणं कठीण होऊन बसतं.
* सांध्यांमध्ये काठिण्य निर्माण होऊ लागतं. कालांतराने सांधे आखडू लागतात. हाडांमध्ये युरिक ऍसिड साठल्यामुळे हा त्रास होऊ शकतो. विशिष्ट प्रकारच्या आहारामुळे शरीरात युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि सांधे आखडू लागतात.
* आर्थ्रायटिसच्या सुरूवातीला सांधे सैल किंवा नरम पडू शकतात. आर्थ्रायटिसच्या प्राथमिक टप्प्यात पायांवर परिणाम होतो. पायांचे सांधे आखडू लागतात आणि चालताना अडथळे येतात.
* सांधे सैल पडले तरी स्नायूंमधली लवचिकता निघून जाते. हालचालींवर मर्यादा येतात. सुरूवातीला या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं. परिणामी, शरीरातले इतर सांधेही आखडू लागतात * आर्थ्रायटिसमध्ये सांध्यांना सूज येऊ लागते. यामुळे उठणं, बसणंच नाही तर व्यायाम करतानाही त्रास होतो. वेळेत उपचार झाल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.









