वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये देशातील पहिले जगन्नाथ मंदिर बांधले जाणार आहे. यासाठी ओडिशा वंशाचे उद्योगपती विश्वनाथ पटनायक यांनी 254 कोटी ऊपयांची देणगी दिली आहे. मंदिर उभारणीचा पहिला टप्पा पुढील वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे मंदिर इंग्लंडमधील धर्मादाय आयोगाकडे नोंदणीकृत श्री जगन्नाथ सोसायटीद्वारे बांधले जात आहे.
फिनेस्ट ग्रुपचे संस्थापक पटनायक आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण कार हे मंदिराच्या बांधकामासाठी मुख्य देणगीदारांपैकी एक आहेत. पटनायक यांच्या वतीने फिनेस्ट ग्रुपच्या कंपन्यांकडून 254 कोटी रुपये दिले जातील, असे कार यांनी सांगितले. मंदिराच्या बांधकामासाठी 15 एकर जमीन खरेदी करण्यासाठी समूहाने 71 कोटी रुपयांची घोषणा केली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लंडनमध्ये पहिल्या श्री जगन्नाथ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय उच्चायुक्तालयाचे उपायुक्त सुजित घोष आणि भारताचे सांस्कृतिक मंत्री अमिश त्रिपाठी उपस्थित होते. याशिवाय पुरीचे महाराज गजपती दिव्यसिंह देव हे महाराणी लीलाबती पट्टमहादेई यांच्यासोबत सामील झाले. याच परिषदेत पटनायक यांनी मंदिरासाठी 254 कोटी ऊपयांची देणगी देण्याचे वचन दिले.
मंदिराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व भाविकांना भगवान जगन्नाथावर श्र्रद्धा ठेवून काम करावे लागेल. इंग्लंडमधील धर्मादाय आयोगानुसार, मंदिरासाठी जमिनीची ओळख पटली असून ती खरेदीच्या अंतिम टप्प्यात आहे. मंदिर उभारणीच्या परवानगीसाठी पूर्वनियोजन अर्जही स्थानिक सरकारकडे सादर करण्यात आला आहे.
लंडनमध्ये बांधण्यात येणारे मंदिर हे युरोपातील पहिले जगन्नाथ मंदिर असेल. नोव्हेंबर 2021 मध्ये लंडनमधील श्री जगन्नाथ मंदिराच्या विधीनुसार प्रथमच भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या अवतारांना भगवान विष्णूचे दिव्य शस्त्र, सुदर्शन चक्राने अभिषेक करण्यात आला. या तिन्ही मूर्ती सध्या ब्रिटनमधील सर्वात जुन्या साउथॉलच्या श्री राम मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. बौद्ध, जैन आणि शीख धर्मीयांसाठीही भगवान जगन्नाथाचे विशेष महत्त्व आहे.