वृत्तसंस्था/ दुबई
लंकन संघातील फिरकी गोलंदाज अकिला धनंजय याच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये दोष आढळल्याने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यावर बंदी घालण्यात आली होती. आयसीसीच्या गोलंदाजी निरीक्षक पथकाने धनंजयच्या गोलंदाजी शैलीची पुन्हा चाचणी घेतली. या चाचणीमध्ये त्याची गोलंदाजी सुधारणा झाली असल्याचे आढळून आल्याने आयसीसीने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा गोलंदाजी करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.
2019 साली 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान गॅले येथे झालेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात अकिला धनंजयच्या गोलंदाजी शैलीबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. सामनाधिकाऱयांनी आपला अहवालामध्ये धनंजयची गोलंदाजी योग्य नसल्याचे नमूद केले होते. या तक्रारीनंतर आयसीसीने धनंजयला सुमारे एक वर्षांच्या कालावधीसाठी गोलंदाजी करण्यावर निर्बंध घातले होते. 27 वर्षीय अकिला धनंजयने 6 कसोटी, 36 वनडे आणि 22 टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व करताना एकूण 106 बळी नोंदविले आहेत.









