कोलंबो / वृत्तसंस्था
थिसारा पेरेराच्या नेतृत्वाखालील जाफना किंग्स संघाने डम्बुला जायंट्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत लंका प्रीमियर लीग स्पर्धेच्या प्ले-ऑफमधील स्थान निश्चित केले. आर. प्रेमदासा स्टेडियमवरील या स्पर्धेत जाफना किंग्स संघाचा हा सलग पाचवा विजय होता. जाफना किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण करत डम्बुला जायंट्स संघाला अवघ्या 69 धावांमध्येच गारद केले. चतुरंगा डीसिल्वाने 16 धावांमध्येच 4 फलंदाज बाद केले. प्रत्युत्तरात 70 धावांचा पाठलाग करताना जाफना संघाचा उपूल थरंगा स्वस्तात बाद झाला. मात्र, तिसऱया स्थानी बढतीवर आलेल्या वणिंदू हसरंगाने 18 चेंडूत 37 धावांची आतषबाजी करत संघाला विजयपथावर आणले. अविष्का फर्नांडोनेही 17 चेंडूत जलद 22 धावांचे योगदान दिले.









