बिग बॅशमधील सन्सेशन टीम डेव्हिड, दुष्मंता चमीरा यांच्याशीही नवे करार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताविरुद्ध टी-20 मालिका जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱया लंकन फिरकी गोलंदाज वणिंदू हसरंगाला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) प्रँचायझीने उर्वरित आयपीएल हंगामासाठी करारबद्ध केले. याशिवाय, आणखी एक लंकन मध्यमगती गोलंदाज दुष्मंता चमीरा व बिग बॅश सन्सेशन टीम डेव्हिड हे देखील आरसीबी संघाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याचे शनिवारी निश्चित झाले. आरसीबीने ट्वीटर हँडलवरुन या करारांची घोषणा केली.
जागतिक टी-20 मानांकन यादीतील द्वितीय मानांकित हसरंगा हा उर्वरित आयपीएल टप्प्यासाठी ऍडम झाम्पाची जागा घेईल तर दुष्मंत चमीराची निवड डॅनिएल सॅम्सच्या जागी केली गेली आहे. या संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांनी वैयक्तिक कारणास्तव आपण रुजू होऊ शकणार नसल्याचे कळवल्यानंतर माईक हेस्सन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली गेली आहे.
आरसीबी संघातील भारतीय खेळाडू, सपोर्ट स्टाफ व संघव्यवस्थापनातील सदस्य दि. 21 ऑगस्ट रोजी बेंगळूरमध्ये एकत्र आले असून ते तेथे 7 दिवस क्वारन्टाईन असणार आहेत. या कालावधीत प्रत्येक 3 दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी देखील होणार आहे.
क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर दि. 29 ऑगस्ट रोजी आरसीबी संघ बेंगळूरहून चार्टर्ड फ्लाईटने रवाना होईल. अन्य आंतरराष्ट्रीय खेळाडू व स्टाफ दि. 29 ऑगस्टनंतर युएईमध्ये संघात दाखल होतील. युएईमध्ये सर्व सदस्यांसाठी आणखी 6 दिवसांचे क्वारन्टाईन असेल.
‘पहिल्या टप्प्यातील दर्जेदार कामगिरी उर्वरित टप्प्यात देखील कायम राखण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी संघात काही आवश्यक फेरबदल करण्याची यापेक्षा दुसरी उत्तम वेळ नसेल’, असे नूतन प्रशिक्षक हेस्सन याप्रसंगी म्हणाले. भारताविरुद्ध 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 7 बळी घेणाऱया हसरंगाने एका लढतीत 9 धावात 4 बळी, असे लक्षवेधी पृथक्करण नोंदवले होते. त्यामुळेच, त्याला आरसीबी संघात करारबद्ध केले का, या प्रश्नावर हेस्सन यांनी हे एकमेव कारण नसले तरी काही कारणांपैकी एक असल्याचे उत्तर दिले.
‘केवळ एकाच सामन्यावर किंवा एका मालिकेतील कामगिरीच्या निकषावर आम्ही या निवडीप्रत आलेलो नाही. हसरंगा दर्जेदार खेळाडू आहे आणि अलीकडील कालावधीत त्याने आपल्या खेळात उत्तम सातत्य राखले आहे. तळाच्या स्थानी उत्तम फलंदाजीची त्याची क्षमता उपयुक्त ठरु शकते. चहलसमवेत एक विदेशी फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय झाला तर ही बाब महत्त्वाची ठरु शकते’, असे हेस्सन म्हणाले. हसरंगाने आतापर्यंत खेळलेल्या 24 टी-20 सामन्यात 6.56 च्या इकॉनॉमी रेटने 33 बळी घेतले आहेत.
पंजाबच्या राखीव खेळाडूंमध्ये नॅथन इलिसचा समावेश
नवी दिल्ली ः आयपीएल प्रँचायझी पंजाब किंग्स इलेव्हनने उर्वरित आयपीएल हंगामासाठी ऑस्ट्रेलियन मध्यमगती गोलंदाज नॅथन इलिसचा राखीव खेळाडू या नात्याने समावेश केला आहे. उर्वरित आयपीएल लढतीत रिले मेरेडिथ व केन रिचर्डसन खेळू शकणार नाहीत, हे निश्चित आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाबने इलिसला करारबद्ध केले. क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर इलिस लवकरच संघात दाखल होईल, असे पंजाब व्यवस्थापनाने यावेळी नमूद केले.
नॅथन इलिसने अलीकडेच आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या लढतीत हॅट्ट्रिक नोंदवणारा पहिला गोलंदाज बनत अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले होते. याच महिन्यात बांगलादेशविरुद्ध झालेल्या त्या लढतीत इलिसने 34 धावात 3 बळी, असे पृथक्करण नोंदवले. त्याचा 2021 टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियन संघात राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे. इलिसने यापूर्वी 2021 बिग बॅश लीगमध्ये जोरदार कामगिरी साकारली होती. होबार्ट हरिकेन्सतर्फे खेळताना त्याने 14 सामन्यात सर्वाधिक 20 बळी घेतले. या हंगामात त्याने होबार्ट प्रँचायझीतर्फे जवळपास सर्व सामने खेळले आणि त्यांना जवळपास बाद फेरीत स्थान निश्चित करुन दिले होते.









