भारत-न्यूझीलंड यांच्यात जयपूरमध्ये पहिली टी-20, टी-20 वर्ल्डकपमधील अपयश मागे सारत नव्याने संघबांधणीचे आव्हान
जयपूर / वृत्तसंस्था
टी-20 वर्ल्डकपमध्ये कटू वास्तव पचवावे लागल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज (बुधवार दि. 17) नवा कर्णधार रोहित शर्मा व नूतन प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पर्वाला सुरुवात करेल. भारत-न्यूझीलंड यांच्यात होणाऱया 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आज येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. सायंकाळी 7 वाजता लढतीला सुरुवात होईल.
मावळते प्रशिक्षक-कर्णधार रवी शास्त्री-विराट कोहली जोडीला सातत्याने टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर कोर्स करेक्शनची गरज भासली आणि त्यानुसार काही फेरबदल केले गेले आहेत. संयुक्त अरब अमिरातीत संपन्न झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पत्कराव्या लागलेल्या अपयशामुळे भारताला हार्दिक पंडय़ाच्या पलीकडे पहावे लागेल, हे जणू अधोरेखित झाले.
आयपीएलमधील स्टार परफॉर्मर वेंकटेश अय्यरला हार्दिक पंडय़ाच्या जागी स्थान दिले गेले असून जलद गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला आजमावले जात असल्याचे हे संकेत मानले जातात. यामुळे फलंदाजीच्या आघाडीवर भारताला आणखी पॉवर हिटर समाविष्ट करण्याची मुभा असेल. यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरचे प्रतिनिधीत्व करणाऱया वेंकटेश अय्यरने यापूर्वीच आपली खेळावरील हुकूमत अधोरेखित केली आहे.
आयपीएल परफॉर्मर्सना संधी

ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल, अवेश खान, यजुवेंद्र चहल या आयपीएलमधील स्टार परफॉर्मर खेळाडूंनाही या मालिकेसाठी संधी दिली गेली आहे. यापैकी यजुवेंद्र चहलला वर्ल्डकपमधून वगळले जाणे धक्कादायक ठरले होते. न्यूझीलंडविरुद्ध या मालिकेतून जसप्रित बुमराहला विश्रांती दिली असल्याने भारताला प्रतितास 140 किमीपेक्षा अधिक वेगाने मारा करु शकणाऱया गोलंदाजाची आवश्यकता असून त्या पार्श्वभूमीवर अवेश खान व मोहम्मद सिराज यांच्यावर मुख्य फोकस असू शकेल.
यापूर्वी संयुक्त अरब अमिरातमध्ये निष्प्रभ ठरलेल्या भुवनेश्वर कुमारला आपला अव्वल दर्जाचा खेळ साकारण्यासाठी येथे आणखी एक संधी देण्यात आली आहे. अवघ्या 12 महिन्यांच्या कालावधीतच ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकप होत असून तेथील स्थानिक वातावरण पाहता नव्याने जडणघडण करण्यावर रोहित-द्रविड यांचा भर असेल, असे संकेत आहेत.
चौथ्या स्थानी सुर्यकुमार?

मधल्या फळीत सुर्यकुमार यादवला यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत फारसा सूर सापडला नाही. पण, चौथ्या स्थानाची चिंता मिटवण्यासाठी सद्यस्थितीत भारताकडे त्याचाच एकमेव पर्याय आश्वासक भासतो आहे. रविंद्र जडेजाला या टी-20 मालिकेतून विश्रांती दिली गेली असून त्याची जागा भरुन काढण्याची संधी अक्षर पटेलकडे असेल. रविचंद्रन अश्विनचे अंतिम एकादशमधील स्थान अबाधित राहण्याची शक्यता चर्चेत आहे.
अलीकडेच संपन्न झालेल्या विश्वचषकात भारताकडे गोलंदाजीत फक्त 5 पर्याय होते आणि अन्य संघांनी मात्र काही वेळा अगदी 6-7 गोलंदाजांनाही संधी दिली. भारताला पाचच गोलंदाजांवर अवलंबून राहिल्याचा फटका दोनवेळा बसला आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी येथे अष्टपैलू खेळाडूंवर भारताचा निश्चितपणाने भर असेल. विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आणणारा न्यूझीलंडचा संघ चार्टर फ्लाईटने जयपूरमध्ये दाखल झाला असून विश्वचषकानंतर लगोलग या स्पर्धेत खेळावे लागत असल्याने फोकस ठेवणे आव्हानात्मक असल्याचे किवीज मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड ः टीम साऊदी (कर्णधार), मार्टिन गप्टील, डॅरेल मिशेल, लॉकी फर्ग्युसन, काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, जिम्मी नीशम, मार्क चॅपमन, ग्लेन फिलीप्स, मिशेल सॅन्टनर, टीम सेफर्ट, ईश सोधी, टॉड ऍस्ले, ट्रेंट बोल्ट,
सामन्याची वेळ ः सायं. 7 वा.
भारतीय संघातील 5 फलंदाज सलामीवीर! क्रमवारी निश्चित करणे, हेच बडे आव्हान!
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजीला उतरण्याचा वकूब असणारे 5 फलंदाज या टी-20 संघात असून त्यांची क्रमवारी ठरवणे, हे व्यवस्थापनासमोरील मुख्य आव्हान असेल. आज होणाऱया पहिल्या सामन्यात रोहित शर्मा व उपकर्णधार केएल राहुल सलामीला उतरतील, हे जवळपास स्पष्ट आहे. मात्र, इशान किशन, वेंकटेश अय्यर, ऋतुराज गायकवाड यांनाही आजमावण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे, या फलंदाजांची क्रमवारी कशी असेल, याची उत्सुकता असेल. आश्चर्य म्हणजे वेंकटेश अय्यरने आयपीएलमध्ये केकेआरतर्फे आपल्या सर्व धावा सलामीला उतरत केल्या. येथे मात्र त्याला मधल्या फळीत उतरावे लागेल, असेच सध्याचे चित्र आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला टी-20 मालिकेतून विश्रांती
भारताविरुद्ध आजपासून खेळवल्या जाणाऱया टी-20 मालिकेतून किवीज कर्णधार केन विल्यम्सनने माघार घेतली. 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला. उभय संघातील पहिली कसोटी दि. 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत केन विल्यम्सनच्या गैरहजेरीत टीम साऊदीकडे नेतृत्वाची धुरा असेल.
‘तिन्ही टी-20 सामने अवघ्या 6 दिवसांच्या कालावधीत होत आहेत. यातून माघार घेतल्याने विल्यम्सनला कसोटी मालिकेवर तयारीसाठी पूर्ण भर देता येईल. यादृष्टीने त्याला टी-20 मधून विश्रांती मिळणे आवश्यक होते’, असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने नमूद केले.
काईल जेमिसन, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलीप्स व मिशेल सॅन्टनर हे खेळाडू या दोन्ही मालिकांसाठी उपलब्ध असतील. जलद गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीतून उत्तम सावरत असून टी-20 मालिकेसाठी तो ही वेळीच उपलब्ध असेल, अशी किवीज व्यवस्थापनाला आशा आहे.









