मुंबई इंडियन्सचा कर्णधार व भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाजीतील भक्कम आधारस्तंभ रोहित शर्माला वगळल्याबद्दल विविध स्तरातून आताही तीव्र नाराजी व्यक्त होते आहे. माजी भारतीय सलामीवीर विरेंद्र सेहवागने देखील यात भाग घेतला असून जर रोहित शर्मा तंदुरुस्त नव्हता तर तो स्टेडियममध्ये काय करत होता, असा जळजळीत सवाल त्याने उपस्थित केला आहे. आरसीबीविरुद्ध मुंबई इंडियन्स लढतीत रोहित सलग तिसऱयांदा खेळू शकला नाही. पण, पूर्ण सामन्यादरम्यान तो डगआऊटमध्ये बसून होता.
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयाकरिता रोहित शर्माचा भारतीय संघात समावेश केला गेला नाही आणि यावरुन भारतीय क्रिकेट वर्तुळात जोरदार वादंग रंगले आहे. रोहितची आयपीएल प्रँचायझी मुंबई इंडियन्सने त्याच्या दुखापतीचे स्वरुप याबाबत काहीही चित्र स्पष्ट केलेले नाही, कोणतीही माहिती देखील दिलेली नाही. पण, याचवेळी त्यांनी रोहित सराव करत असल्याची काही छायाचित्रे व व्हीडिओ मात्र प्रसारित केले होते. तूर्तास, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रोहित व जलद गोलंदाज इशांत शर्मा यांच्यावर आपले वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असेल, असे म्हटले आहे.
दरम्यान, रोहितचा सध्याची दुखापत पाहता त्याला संघातून वगळण्याची काहीच गरज नव्हती, असे विरुचे मत आहे. ‘मी खेळत असताना कृष्णम्माचारी श्रीकांत निवड समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी निवडीच्या दिवशी जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर त्याला निवडले जात नव्हते. पण, ऑस्ट्रेलियाचा दौरा प्रदीर्घ स्वरुपाचा आहे आणि रोहित हा स्वतः महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे, निवडीच्या पूर्वी त्याला झालेली दुखापत नजरेसमोर ठेवून असा निर्णय घेतला गेला असेल तर हा रोहितवर निश्चितच अन्याय आहे’, असे सेहवाग क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
मुंबई इंडियन्सने याबाबत स्वतंत्र पत्रक जारी करत रोहितच्या दुखापतीविषयी चित्र स्पष्ट करायला हवे का, या प्रश्नावर सेहवागने होकारार्थी उत्तर दिले. ‘अगदी मलाही रोहित शर्माच्या दुखापतीविषयक स्पष्ट चित्र काय आहे, याची कल्पना नाही. माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरायला हवा. यापूर्वी, तो तंदुरुस्त नाही, असे सांगण्यात आले. पण, तसे असेल तर तो स्टेडियममध्ये काय करत होता, हा माझा प्रश्न आहे. जर तो तंदुरुस्त नसेल तर त्याने पूर्ण विश्रांती घ्यायला हवी, जेणेकरुन लवकर पुन्हा मैदानात परतता येईल. पण, सध्याचे एकंदरीत चित्र पाहता, त्याची प्रकृती ठीक नाही, असे अजिबात दिसून येत नाही. सध्या मुंबई इंडियन्सने किमान सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी रोहितच्या दुखापतीविषयी स्पष्टता आणायला हवी’, असे तो म्हणाला.









