राजू चव्हाण/ खेड
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते रत्नागिरीपर्यंत चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या डिसेंबरपासून या मार्गावर रेल्वे विजेवर धावणार असून यामुळे कोकण रेल्वेच्या इंधन खर्चात मोठी बचत होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱया सर्वच रेल्वेगाडय़ा डिझेल इंजिनवर धावत आहेत. यामुळे इंधनासाठी मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी कोकण मार्गाच्या विद्युतीगरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार कोकण मार्गावर गेल्या तीन वर्षांपासून विद्युतीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली. रोहा ते कर्नाटकातील ठोकूर या 738 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे विद्युतीकरण मे 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
यासाठी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी, खारेपाटण, कणकवली, थिविम याठिकाणी ट्रक्शन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. कोकण मार्गावरील माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी याठिकाणी 4 उपकेंद्रांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या चारही विद्युत उपकेंद्रातील जोडणीचे काम सद्यस्थितीत जवळपास पूर्ण झाले आहे.
कोकण रेल्वेला विद्युतीकरणासाठी डिसेंबर 2020ची कालमर्यादा ठेकाधारक एल ऍण्ड टी कंपनीला देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीकडून 2017 पासून जोमात काम सुरू होते. रोहा ते रत्नागिरीपर्यंत तीन टप्प्यात चाचणीनंतरच डिसेंबर महिन्यापासून रेल्वेगाडय़ा विजेवर धावणार आहेत. कोकण मार्गावरील रोहा ते वेर्णा (गोवा) व वेर्णा ते ठोकूर (कर्नाटक) या दोन टप्प्यांमध्ये विद्युतीकरणासाठी 1100 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून आतापर्यंत 456 कोटी खर्च झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते रत्नागिरीपर्यंतच्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून विद्युतीकरणाच्या रितसर चाचण्याही करण्यात येतील.
सचिन देसाई
कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी









