बेळगाव तालुक्यात सर्वाधिक 188 शाळांना लाभ
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात रोजगार हमी योजनेतून विविध शाळांचे सुशोभिकरण, मैदान आणि संरक्षक भिंती बांधकामाची कामे हाती घेण्यात आली आहेत. 2020 ते 22 पर्यंत 826 शाळांना याचा लाभ मिळाला असून बेळगाव तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात सर्वाधिक 188 शाळांमध्ये कामे हाती घेण्यात आली आहेत.
रोजगार हमी योजनेतून विविध खात्यांच्या विकासकामात हातभार लावला जात आहे. शिक्षण खात्याकडे शाळा, मैदान आणि संरक्षक भिंत बांधकाम आणि दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही. त्यासाठी 2020 साली सदर कामासाठी जि. पं. ने पुढाकार घेत रोजगार हमीतून शाळांना सुसज्ज मैदाने उपलब्ध करून दिली जात आहेत. आतापर्यंत 36 शाळांतील कामे पूर्ण झाली असून 315 कामे प्रगतिपथावर आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळा आवारात रनिंग ट्रक, थ्रोबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, क्रिकेट, कबड्डीचे मैदान तसेच लांब उडी आणि उंच उडीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. शाळा आवाराचे सपाटीकरण आणि फुला-फळांची झाडे लावून सुशोभिकरण केले जात आहे. अनेक शाळांत संरक्षक भिंतीअभावी मद्यपींकडून अवैध प्रकार चालत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यावरही उपाय म्हणून संरक्षक भिंती बांधल्या जात आहेत.
सदस्य–अधिकाऱयांत कलगीतुरा
ग्रा. पं. सदस्य आणि अधिकाऱयांतील वादामुळे रोजगार हमीची कामे रखडली आहेत. 2020 मध्ये 826 कामांना सुरुवात करण्यात आली होती. त्यातील केवळ 36 पूर्ण झाली आहेत. नेहमीच्या वादामुळे 448 कामे रखडली आहेत.









