सोमवारी 270 नवे रुग्ण, 5 जण दगावले, आतापर्यंत 6 हजार जण झाले कोरोनामुक्त
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्येत किंचित घट होत चालली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत रोज 400 चा आकडा होता. तो निम्यावर आला आहे. सोमवारी जिल्हय़ातील 270 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर बेळगाव, सौंदत्ती तालुक्मयांतील पाच जण कोरोनामुळे दगावले आहेत. सोमवारी एकूण बाधितांच्या संख्येने दहा हजारांचा आकडा पार केला आहे.
यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 121 जणांचा समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार बेळगाव शहर व उपनगरांतील 88 व ग्रामीण भागातील 33 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांना लागण सुरुच आहे. बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. लक्षणे नसणाऱयांवर घरीच उपचाराची मुभा देण्यात आली आहे.
काकती, गौंडवाड, हुंचेनट्टी, करडीगुद्दी, सांबरा, बसरीकट्टी, हलगा, किणये, शिंदोळी, रणकुंडये, मंडोळी रोड, पिरनवाडी, गणेशपूर, हिरेबागेवाडी, वंटमुरी, राणी चन्नम्मानगर, जुने गांधीनगर, शाहूनगर, अनगोळ, कॅम्प, सह्याद्रीनगर, शिवबसवनगर, विजयनगर, खासबाग, सदाशिवनगर, मच्छे, सरस्वतीनगर-गणेशपूर, निलजी, पंतनगर, हनुमाननगर येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
अमाननगर, रुक्मिणीनगर, कावेरीनगर, चव्हाट गल्ली, गणपत गल्ली, टिळकवाडी, गंगानगर, अशोकनगर, भाग्यनगर, वीरभद्रनगर, कामत गल्ली, पोलीस हेडक्वॉर्टर्स, टी.व्ही.सेंटर, चौगुलेवाडी, गोंधळी गल्ली, समर्थनगर, बसवनकुडची, हिंदवाडी, कणबर्गी, सुभाषनगर, अजमनगर, अंजनेयनगर, कोनवाळ गल्ली, नार्वेकर गल्ली-बेळगाव, काळी आमराई, शिवाजीनगर, रामतीर्थनगर, आदर्शनगर, क्लब रोड, काकतीवेस परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
बेळगाव तालुक्मयातील चार व सौंदत्ती तालुक्मयातील एक असे एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हा केवळ सरकारी इस्पितळातील मृतांचा आकडा आहे. प्रत्यक्षात बेळगाव शहर व उपनगरांतील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. खासगी इस्पितळात मृत्युमुखी पडणाऱयांचा तपशील यामध्ये नाही.
सोमवारी रात्री जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण बाधितांची संख्या 10 हजार 262 वर पोहोचली आहे. यापैकी 6 हजार जण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 4 हजार 100 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत 161 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात हा आकडा मोठा आहे.
आणखी 1 हजार 463 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहे. जिल्हय़ातील 29 हजार 765 जण अद्याप होमकेअरमध्ये आहेत. तर आरोग्य विभागाकडून आतापर्यंत 80 हजार 556 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 79 हजार 260 जणांची स्वॅब तपासणी झाली असून यापैकी 66 हजार 613 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
खासगी इस्पितळातील मृत्यूंची सरकार दरबारी नोंद नाही
सध्या कोरोनाबाधितांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून स्वॅब तपासणी केली जाते. अनेक जण खासगी इस्पितळात सिटीस्कॅन करुन कोरोनाचा संशय बळावला की खासगी इस्पितळातच उपचार घेतात. अशा रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारी यादीत त्यांचा समावेश होत नाही. असे आढळून आले आहे. कारण कोरोनाची लागण झाली असली तरी स्वॅब तपासणी अहवाल नसल्यामुळे केवळ संशयित म्हणून नोंद करुन असे मृतदेह महानगरपालिकेकडे सोपविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांची नेमकी संख्या मिळविणे सरकारी यंत्रणेला कठीण जात आहे. खासगी इस्पितळात स्वॅब तपासणी ऐवजी रक्त तपासणी व सिटीस्कॅनच्या माध्यमातून रोग निदान केले जात आहे. अशा रुग्णांची नोंद सरकारी यादीत होत नाही.









