सुदीप ताम्हणकर यांची मागणी , कंपनीची पार्श्वभूमी आर्थिक गुन्हेगारीची
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील टॅक्सींना मीटर बसविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ’रोजमार्टा ऑटोटेक प्रा. लि.’ या कंपनीचा मालक घोटाळेबाज आणि आर्थिक गुन्हेगार असल्यामुळे हल्लीच त्याला बंगळूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे त्याचे कंत्राट त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी अखिल गोवा बसमालक संघटनेने केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष सुदिप ताम्हणकर यांनी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून सरकारने कारवाई न केल्यास गोवा पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
एखाद्या कंपनीस सरकारी कंत्राट देताना सदर कंपनीच्या संचालक मंडळातील कोणत्याही सदस्यावर गुन्हेगारी कृत्यात गुंतल्याचा आरोप असू नये, अशी सर्वसामान्य अट असते. कंत्राट देताना त्याची सत्यताही तपासली जाऊन खात्री करण्यात येते. परंतु रोजमार्टा कंपनीचा मालक विवेक नागपाल हा स्वतःच विविध आर्थिक गुह्यात गुंतलेला असल्याचे आढळून आले आहे. नागपूर, उत्तर प्रदेश, दिल्ली, बंगळूर आदी अनेक राज्यात त्यांनी उच्च सुरक्षा क्रमांकपट्टय़ा पुरविणे, व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम यंत्रणा, स्मार्टकार्ड पुरविणे यासारख्या व्यवसायांची कंत्राटे मिळविली आहेत. त्यातील बऱयाच कंत्राटांची नंतर त्याने अन्य कंपन्यांना उपकंत्राटे दिली आहेत. त्याद्वारे त्यांच्याकडून कोटय़वधी रुपये गोळा केले असून नंतर त्यांची फसवणूक केली आहे. त्याप्रकरणी कर्नाटक राज्यातील सीआयडीने दि. 12 सप्टेंबर रोजी त्याला अटक केली आहे.
नागपाल यांचे वडील तसेच करण आणि कार्तिक हे दोघे पूत्रही त्या कंपनीचे संचालक आहेत. त्यावरून सदर कंपनी ही कौटुंबिक असल्याचे स्पष्ट होत आहे, असे ताम्हणकर म्हणाले. त्यामुळे सदरची माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही लगेचच वाहतूक खाते व इतर संबंधितांना निवेदने देऊन त्याचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, ते पाहता राज्य सरकार त्याला पाठिशी घालत आहे की काय, असा संशय निर्माण झाला आहे, असे ताम्हणकर यांनी सांगितले.
सरकारच्या तोंडून आम्ही सदैव पारदर्शकतेच्या गोष्टी ऐकत आलो आहे. मात्र रोजमार्टा कंपनीला कंत्राट देताना त्यांनी कोणतीही पारदर्शकता पाळली नव्हती हेच सिद्ध होत आहे. त्यामुळे सदर कंत्राट त्वरित रद्द करण्यात यावे, अशी मागणी ताम्हणकर यांनी केली.









