जितोने समर्थनम् संस्थेच्या सहकार्याने भरविला भव्य रोजगार मेळावा : अनेकांना शिक्षण-कौशल्यानुसार नोकरीत दिली संधी

प्रतिनिधी /बेळगाव
दिव्यांगदेखील समाजाचा एक भाग असून त्यांना संधी दिल्यास त्या संधीचे ते सोने करू शकतात, हे जितोने समर्थनम् संस्थेच्या सहकार्याने भव्य रोजगार मेळावा घेऊन दाखवून दिले आहे. जिल्हाभरातून शेकडो दिव्यांग रोजगार मेळाव्यासाठी दाखल झाले होते. यातील अनेकांना त्यांच्या शिक्षण व कौशल्याप्रमाणे नोकरी देण्यात आल्याने त्यांच्या चेहऱयावरील आनंद ओसंडून वाहत होता.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) व समर्थनम् संस्थेच्या माध्यमातून मंगळवारी बेळगावमध्ये प्रथमच धर्मनाथ भवन येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर समर्थनम् इंटरनॅशनलचे चेअरमन डॉ. महांतेश किडसण्णावर, जितो बेळगावचे चेअरमन पुष्पक हणमण्णावर, जितो ऍपेक्सचे संचालक सतीश मेहता, माजी मंत्री आर. एम. पाटील, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख बसवप्रभू, जितोचे सेपेटरी अमित दोशी, स्वनिल शहा, अशोक दनवाडे, अशोक जैन, संमत्ती कस्तुरी, उदयकुमार, संजय कुचनूर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. लुई ब्रेन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
समर्थनम् संस्थेचे प्रमुख महांतेश किडसण्णावर म्हणाले, टायफॉईडच्या तापामुळे माझे डोळे गेले. परंतु मी कधीच हार मानली नाही. आहे त्या परिस्थितीशी दोन हात करीत पुढे गेलो. आपण दिव्यांग आहे म्हणून कोणीही निराश होवू नका. सध्या आपल्याला संधी मिळाली असून त्या संधीचे सोने करा, असे आवाहन उपस्थितांना केले.
जितो बेळगावचे अध्यक्ष पुष्पक हणमण्णावर म्हणाले, हा रोजगार मेळावा विशेष लोकांसाठीचा आहे. इतर मनुष्यापेक्षा या विशेष व्यक्तींजवळ असणारी ऊर्जा अधिक आहे. दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी जे शिवधनुष्य पेलले ते सहकाऱयांच्या सहकार्यामुळेच. ज्या कंपन्या येथे येवू शकल्या नाहीत अशा कंपन्यांसाठी कौशल्य प्राप्त दिव्यांग कंपनीला पाठविले जातील, असेही त्यांनी सांगितले. गौरी गजबर यांनी या रोजगार मेळाव्यासाठी मेहनत घेतली. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. रोजगार मेळाव्यासाठी स्वयंसेवक म्हणून युथ फॉर सेवाच्या सदस्यांनी काम पाहिले. बेळगावसह कोल्हापूर येथून नामांकित कंपन्या व संस्था या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. केएलई, वेगा, एकस, भरतेश, अस्टरआधार हॉस्पिटल, रिलायन्स गिरीयास, केएलई स्वशक्तीसारख्या नामांकित कंपन्या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थनम्चे समन्वयक अरुणकुमार यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती रॉबर्ट यांनी हस्तमुदेद्वारे कर्णबधिरांना दिली.









