आग्नेल फर्नांडिस यांची मागणी
प्रतिनिधी / म्हापसा
कळंगूट येथील व्यावसायिक रॉय फर्नांडिस यांच्यावर वेर्ला काणकात झालेल्या हल्ल्यामागे मायकल लोबो यांचा हात असल्याचा गंभीर आरोप कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस यांनी केला आहे. या प्रकरणात गुंतलेल्यांची चौकशी करावी. आरोपींना गजाआड करण्याची जोरदार मागणी फर्नांडिस यांच्याकडून करण्यात आली आहे.
कळंगूट येथील काँग्रेस कार्यालयात मंगळवारी सकाळी घेण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत आग्नेलो फर्नांडिस बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके, कळंगुटचे माजी सरपंच जोजफ सिक्वेरा, कळंगूट काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोरगांवकर तसेच कळंगूट नागरिक फोरमचे बेनेडिक्ट डिसोझा उपस्थित होते.
रॉय फर्नांडिस यांच्यावर रोहीत हरमलकर व साथींकडून झालेला हल्ला हा पूर्वनियोजित तसेच फिल्मी स्टाईल जीवघेणा हल्ला होता, असे यावेळी फर्नांडिस यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या कळंगुटच्या विद्यमान आमदारांवर आरोपपत्र दाखल न केल्यास स्थानिक कळंगूट फोरम तसेच नागरिक फोरमच्या साहाय्याने रस्त्यावर उतरण्याबरोबरच न्यायालयात जाण्याचा इशारा फर्नांडिस यांच्याकडून देण्यात आला आहे.
राज्यात भू माफिया सक्रिय : भिके
उत्तर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके यांनी राज्यात भू माफियांकडून अराजकता पसरविण्याचा प्रयत्न चालल्याचे सांगितले. पर्वरीत स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यास दिवसाढवळय़ा सर्वांदेखत जाळून मारले जाते, कळंगुटात रॉय फर्नांडिस व त्यांच्या सहकारी मित्रांवर खुलेआम हल्ला होतो या गोष्टी राज्यातील सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र समोर आणत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
जनता आमिषांना बळी पडत नाही : जोजफ सिक्वेरा
राजकारण्याकडून कळंगुटात सिमेंट काँक्रिटचे जंगल उभारण्याचा प्रयत्न चालल्याचा आरोप कळंगुटचे माजी सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी केला मात्र कळंगुटची जनता आता जागरूक झाली असल्याने यापुढे कुणाच्याच फसव्या आमिषांना बळी पडणार नसल्याचे निक्षून सांगितले. कळंगूट नागरिक फोरमचे बेनेडिक्ट डिसोझा तसेच कळंगूट काँग्रेसचे गटाध्यक्ष राजेंद्र कोरगांवकर यांनीही रॉय फर्नांडिस यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.
राजकीय सूड घेण्याचा प्रयत्न : मायकल लोबो
कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले की, माहिती हक्क आयोगाचे रॉय फर्नांडिस यांच्यावर झालेल्या हल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच या हल्ल्यात सहभागी असलेल्या गुंडाना तात्काळ गजाआड करण्याची तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मी स्वतः हणजूणचे पोलीस निरीक्षक सूरज गांवस यांना केली आहे. दरम्यान, या हल्ल्यात माझा सहभाग असल्याचा कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी केलेला आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून त्यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखविण्याचे मी त्यांना आव्हान देतो.









