ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. दरम्यान, उद्योजक आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रियांका गांधी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत याबाबत माहिती दिली.

तसेच आपले कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि पतीला कोरोना झाल्यामुळे त्यांनी स्वत:ला क्वॉरंटाईन करून घेतले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे त्यांच्या सर्व प्रचारसभा रद्द करण्यात आल्या आहेत.
पुढे त्या म्हणाल्या, कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्याने मला आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभा रद्द कराव्या लागत आहेत. काल माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला काही दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे मला प्रचाराला येता येणार नाही. तरीही काँग्रेसचा विजय होईल अशी मला आशा आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
- सप्टेंबरमध्ये देखील प्रियांका झाल्या होत्या क्वारंटाइन!
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात देखील प्रियांका गांधी स्वतः च्या घरी क्वारंटाइन झाल्या होत्या. त्यांच्या घरातील आचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्या 14 दिवस क्वारंटाइनमध्ये होत्या.









